ठाण्यात शिक्षणाचा खेळखंडोबा?

ठाण्यात शिक्षणाचा खेळखंडोबा?
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पटसंख्या वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असतानाच, शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. गुजराती माध्यमातील शिक्षकांकडून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवले जात असल्याची बाब नगरसेवक अनिल भोर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता नसलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा दावा करत त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला.

महापालिकेची सर्वसाधारण तहकूब सभा बुधवारी पार पडली. या वेळी शिक्षण विभागाच्या कामकाजावर चर्चा करताना सदस्यांनी विविध त्रुटींवर बोट ठेवत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनिल भोर यांनी काही शाळांमध्ये तासिक तत्त्वावर नियुक्त शिक्षकांकडे आवश्यक पात्रता नसल्याचे सांगितले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, एका शाळेत वार्षिक परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी होत असल्याची तक्रार शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी संबंधित शाळेची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली; मात्र त्यानंतर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती अद्याप देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असून अनिल भोर यांनी तत्काळ सुधारणा व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

पटसंख्यांची सखोल चौकशी आवश्यक
ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी पालिका शाळांमधील पटसंख्या, माध्यमनिहाय विद्यार्थ्यांची (मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी) सखोल चौकशी करण्याची मागणी केली. प्रत्येक शाळेचे लेखापरीक्षण करून पटसंख्येची पडताळणी करावी; तसेच बोगस पटसंख्या दाखवून ठेकेदारांकडून आर्थिक गैरव्यवहार होत असून यासाठी जबाबदार कोण, याचा शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली.

शाळांची धोकादायक स्थिती
नगरसेविका अर्चना पाटील यांनी शाळा क्रमांक ८० मधील धोकादायक परिस्थिती मांडली. शाळेचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत असून, कोरोनाकाळातील साहित्य अजूनही तसेच पडून असल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडीतील मुलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

मजुरांची मुले शाळेत
नगरसेविका उषा भोईर यांनी ढोकळी परिसरातील शाळेचा मुद्दा उपस्थित करत, शाळेचा निकाल चांगला लागत असला, तरी पटसंख्या वाढवण्यासाठी मजूर वर्गातील मुलांना शाळेत बसवले जात असल्याचा संशय व्यक्त केला. या मुलांना अक्षर व अंकांची ओळख नसतानाही दाखल केले जात असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी महाविद्यालयाची मागणी
साक्षी मढवी यांनी दिवा शहरात एकही माध्यमिक शाळा नसल्याचा मुद्दा उपस्थित करत येथे मराठी महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली. दतिवली येथे उभारलेल्या नव्या शाळेत १०० नवीन बेंचेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com