

बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : बदलापूर पश्चिमेतील चिंतामणी चौक परिसरातील जगन्नाथ प्राईड सोसायटीमध्ये लावण्यात आलेल्या एका सूचना फलकामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोसायटीच्या सुरक्षेसाठी लावलेल्या या फलकावर आवारात फिरताना ‘हिजाब’ तसेच हेल्मेट घालण्यास मनाई असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. विविध धर्मीय नागरिक एकत्र नांदणाऱ्या या सोसायटीत अशा मजकुरामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुस्लिम समाजाची लक्षणीय उपस्थिती असलेल्या भागात या शब्दप्रयोगामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ओळख पटविणे सुलभ व्हावे आणि अनोळखी व्यक्तींवर नियंत्रण ठेवता यावे, हा सोसायटी प्रशासनाचा उद्देश असला तरी मजकूर मांडताना आवश्यक ती संवेदनशीलता पाळली गेली नाही. पत्रकारांनी ही बाब निदर्शनास आणून देईपर्यंत फलक तसाच लावून ठेवण्यात आल्याने सोसायटी प्रशासनाच्या निष्काळजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे सामाजिक सलोखा, धार्मिक संवेदनशीलता, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सोसायटी प्रशासनाची जबाबदारी या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षेचे नियम आवश्यक असले तरी ते करताना कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य केल्याचा भास होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.
सोसायटीकडून चूक मान्य
सोसायटीचे सचिव सुनील माने यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना, फलकावरील ‘हिजाब’ हा शब्द चुकीने छापला गेला होता. प्रत्यक्षात मास्क किंवा चेहरा झाकून येणाऱ्या व्यक्तींविषयी सूचना देणे अपेक्षित होते. चूक लक्षात आल्यानंतर संबंधित फलक काढून दुरुस्त मजकुरासह नवीन फलक लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
बदलापूर : जगन्नाथ प्राईड सोसायटीमध्ये लावलेला सूचनाफलक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.