

स्वच्छ शहराच्या संकल्पनेला ग्रहण
वसई-विरारमध्ये रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग
वसई, ता. २३ (बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी १७७ कोटींची वाढ केली आहे; मात्र शहरात कचऱ्याचे साम्राज्य ‘जैसे थे’ असल्याने सुंदर शहर, स्वच्छ शहराची घोषणा हवेत विरल्याची चर्चा रंगली आहे.
वसई-विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने झाले आहे. २५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात व्यापारी, दुकाने, गृहसंकुले तसेच सार्वजनिक कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. वसई पूर्वेकडे औद्योगिक वसाहतीतून दैनंदिन ७०० हून अधिक टन कचरा निर्माण होत आहे. स्वच्छता विभागाकडून कचरा जमा करून क्षेपणभूमीवर नेला जातो; मात्र शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. प्लॅस्टिक, घरातील अनावश्यक वस्तू, समारंभातील साहित्य, खाद्यपदार्थांच्या वेष्टनांसह अन्य कचरा रस्त्यावर टाकल्याने दुर्गंधी, डासांच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत आहे.
-----------------------------
भरीव निधीची तरतूद
वसई-विरार शहर पालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात २७४ कोटी ४७ लाख इतकी तरतूद केली होती. त्यामुळे आता पालिकेकडे ४५१ कोटी ६४ कोटींची आर्थिक तरतूद आहे; मात्र शहरातील परिस्थिती पाहता निधीचे नियोजन करताना पालिकेचे कसब पणाला लागणार आहे.
----------------------
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नागरिकांच्या आरोग्यासाठी शहर स्वच्छ मोहिमेचा एल्गार जरी प्रशासन करत असली तरी अस्वच्छतेचे परिसर अनेक ठिकाणी डोके वर काढत आहेत. या समस्येकडे वसई-विरार शहर महापालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तरच नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील, अशी आशा आहे.
---------------------
वसई-विरार शहारत अस्वच्छता असलेल्या ठिकाणांची पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ.
- अजीव पाटील, महापौर