

विलंबित एसी लोकलमुळे प्रवाशांचा खोळंबा
१४ फेऱ्या असूनही अनियमितता; वेळापत्रक आणि प्रत्यक्ष सेवेत तफावत
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात थंडगार प्रवासाचे स्वप्न दाखवणारी एसी लोकल सेवा प्रत्यक्षात मात्र प्रवाशांसाठी ‘गरम’ अनुभव ठरत आहे. हार्बर मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या कमी असतानाही त्या वारंवार विलंबाने धावत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. एसी लोकलच्या नावाने तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना शेवटी नॉन-एसी गाड्यांतूनच घामाघूम प्रवास करावा लागत असून, ही सेवा केवळ दिखाऊ ठरत असल्याची तीव्र टीका होत आहे.
२६ जानेवारी २०२६ पासून हार्बर मार्गावर १४ एसी लोकल फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या नियमित वेळेत धावत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एसी लोकलचे जाहीर वेळापत्रक आणि प्रत्यक्ष सेवा यामध्ये मोठी तफावत दिसून येते. एसी लोकलचे तिकीट घेताना वेळापत्रक पाहूनच तिकीट घ्या, असा सल्ला तिकीट खिडकीवरील रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे. अनेक प्रवासी तिकीट काढतात; मात्र गाडी न मिळाल्याने तिकीट खिडकीवर वादाचे प्रसंग वाढत आहेत. त्यामुळे तिकीट खिडकीवरील वाद टाळण्यासाठी आता स्वतः तिकीट खिडकीवरील रेल्वे कर्मचाऱ्यांकडून एसी लोकल वेळापत्रक बघण्याचा सल्ला दिला जातोय. वेळापत्रकाची स्पष्ट माहिती नसणे आणि फेऱ्यांची अनियमितता यामुळे प्रवाशांचा गोंधळ वाढला आहे.
तिकीट घेतलं, लोकल आली नाही
एसी लोकलच्या नावाने जादा भाडे भरून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना प्रत्यक्षात सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वेळापत्रकात दाखवलेली गाडी न आल्याने प्रवाशांचा संताप वाढतो आहे. परिणामी, तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांशी वादाचे प्रसंग घडत असून परिस्थिती तणावपूर्ण होत आहे. तसेच एसी लोकलचे वेळापत्रक पुरेसे माहीत नसलेले प्रवासीही तिकीट काढतात; मात्र एसी फेऱ्या कमी असल्याने त्यांना एसी लोकल मिळत नाही.
प्रवासी हैराण
जाहीर केलेले वेळापत्रक वारंवार कोलमडत असल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडत आहे. एसी लोकलऐवजी नॉन-एसी गाडी येणे किंवा गाडी रद्द होणे, या प्रकारांमुळे प्रवाशांचा विश्वास कमी झाला आहे. ऐन उन्हाळ्यातही घामाघूम प्रवास करावा लागत असल्याने ही सेवा केवळ कागदोपत्री असल्याची टीका होत आहे.
हार्बर असो किंवा मुख्य मार्ग, एसी लोकलच्या फेऱ्या वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे एसी लोकलचे तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढते. रेल्वे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.
- लता अरगडे,
अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
हार्बर मार्गावर केवळ १४ एसी लोकल फेऱ्या आहेत. त्यादेखील विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना योग्य नियोजन करता येत नाही आणि अनेकांना पास काढण्यात अडचणी येत आहेत. उन्हाळ्याच्या तडाख्यात अपेक्षित एसी सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांचा त्रास अधिक वाढला आहे.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
मध्य रेल्वेचा दावा
मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक नवीन एसी लोकल रेक दाखल झाला असून सध्या त्याच्या तांत्रिक आणि सुरक्षा चाचण्या सुरू आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा रेक लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाईल. हा नवीन रेक हार्बर मार्गावर चालवण्यात येणार असून त्यामुळे एसी लोकलच्या आणखी १४ फेऱ्या वाढणार आहेत. परिणामी, हार्बर मार्गावरील एकूण एसी फेऱ्या २८ वर जाणार आहेत. या वाढीव फेऱ्यांमुळे उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा मिळेल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.