

परिवर्तनीय विज्ञान हे बहुजन हिताय असायला हवे : डॉ. रघुनाथ माशेलकर
प्रभादेवी, ता. २३ (बातमीदार) : नवसंशोधक हे डॉ. घरडा यांच्या जीवन तत्त्वज्ञानाचे मूर्त रूप आहेत. परिवर्तनीय विज्ञान हे केवळ मोजक्या लोकांसाठी नसून ते बहुजन हिताय असायला हवे, यावर आमचा विश्वास आहे, असे मत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले.
भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ‘केएचजी इनोव्हेशन फाउंडेशन’ने चार महत्त्वाच्या आरोग्य-तंत्रज्ञान स्टार्टअप्सची निवड केली आहे. याबाबत वांद्रे येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते माहिती देताना बोलत होते. कमी खर्चात, अधिक लोकांसाठी, अधिक उत्तम सुविधा, हे चारही सूत्र संशोधक सार्थ ठरवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘अगत्स्या सॉफ्टवेअर’ या कंपनीचा समावेश असून, त्यांनी सुईचा वापर न करता रक्तातील साखर आणि रक्तदाब मोजणारे उपकरण विकसित केले आहे. यामुळे वेदनामुक्त निदानाची सोय उपलब्ध झाली आहे.
दुसरीकडे, ‘रेमेडिओ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स’ने डोळ्यांच्या उपचारांसाठी ७० टक्के कमी खर्चात ग्लुकोमा निदानाचे तंत्रज्ञान आणले आहे, जे सामान्य दवाखान्यांसाठी वरदान ठरणार आहे. ‘फास्ट सेन्स इनोव्हेशन्स’ने सेप्सिससारख्या जीवघेण्या आजाराचे निदान अवघ्या काही मिनिटांत करण्याची क्षमता विकसित केली आहे, तर ‘आयु डिव्हाइसेस’ने डिजिटल स्टेथोस्कोपच्या माध्यमातून हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांचे अचूक निदान प्राथमिक आरोग्य केंद्रांतच शक्य होणार असल्याची माहिती माशेलकर यांनी या वेळी दिली.