

ठाण्यात शिवशाही एसी बसला आग
सॅटिस ब्रिजवरील घटनेत १४ प्रवासी बचावले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस ब्रिजवर गुरुवारी (ता. २३) दुपारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) शिवशाही एसी बसने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली. या घटनेत जीवितहानी झालेली नसून प्रवास करणारे सर्व १४ प्रवासी तसेच चालक-वाहक सुरक्षित बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले. आगीवरील नियंत्रणासाठी एक तासाचा कालावधी लागला असून, आगीत बस जळून खाक झाली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी पादचारी पुलाजवळ ही घटना घडली. स्वारगेट ते वसई या मार्गावरील वसई आगारातील शिवशाही बस ठाणे स्थानक येथील बस स्थानकातून पुढे जात असताना त्या बसला अचानक आग लागली. त्या बसला आग लागताच चालक संतोष गवळी व वाहक मिलिंद सोनावणे यांनी तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. बसमध्ये स्वारगेटहून १० आणि ठाण्यातून चार असे एकूण १४ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलिस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पाचारण केलेल्या एक फायर इंजिन, रेस्क्यू वाहन व वॉटर टँकरच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे एक तासाने ती आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले. या घटनेदरम्यान काही काळ वाहतूकही विस्कळित झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
-----------
अग्निशमन दलाला विलंब
‘शिवशाही’ बस जळून खाक होत असताना येथील आपत्कालीन यंत्रणेचे वाभाडे निघाले. बसने पेट घेतल्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटांचा विलंब झाला. त्यामुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली. या पार्श्वभूमीवर, शहराच्या मध्यवर्ती भागात हक्काचे अग्निशमन केंद्र नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे भविष्यात स्थानक परिसर किंवा स्थानकाच्या आत एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
--------------
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
एकत्रित पुनर्विकासाच्या कामात ठाणे स्थानक परिसरातील जुन्या अग्निशमन केंद्राची जागा घेण्यात आली आहे. परिणामी, हे केंद्र साकेतसारख्या दूरच्या भागात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. या निर्णयामुळे स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ आणि सिव्हिल हॉस्पिटल यांसारख्या संवेदनशील भागांपासून अग्निशमन दल दूर गेले आहे. ‘दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात जर तात्पुरत्या स्वरूपात अग्निशमन दलाची एक गाडी तैनात असती, तर जवान अवघ्या ५ ते १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले असते आणि बसचे नुकसान टाळता आले असते. यासंदर्भात वारंवार महापालिकेकडे मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले,’ असे मत भाजप नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी व्यक्त केले. कोळी यांनी यापूर्वीच पत्रव्यवहार करून महापालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र, अग्निशमन दलाने याची दखल न घेतल्याने आज ‘शिवशाही’चे मोठे नुकसान झाले.
पैसे जळाले; दागिने वाचले
बसमधील काही प्रवाशांच्या बॅगेतील सामान जळून खाक झाले, तर या घटनेत एका महिला प्रवाशाच्या बॅगेतील हजारो रुपये आणि १० ते १५ साड्या जळून खाक झाल्या, तर दुसऱ्या एका कुटुंबाने बॅग बाहेर काढल्यामुळे सुमारे साडेतीन तोळ्यांचे दागिने आगीतून वाचवण्यात यश आले. मात्र, त्यांच्या बॅगेतील नवीन कपडे जळाले. हे दोन्ही प्रवासी पुण्याहून अनुक्रमे वसई आणि वापी येथे निघाले होते. दरम्यान, आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.