

भटक्या कुत्र्यांच्या निवारा केंद्रासाठी जागेचा शोध
२३ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तीन वर्षांसाठी नऊ संस्थांना २३ कोटी रुपयांचे कंत्राट काम देण्याबाबत प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. तसेच निवारा केंद्र उभारण्याची मागणी लावून धरली. निवारा केंद्रासाठी पालिकेकडून जागेचा शोध सुरू असून समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
मुंबईत भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने १९९८ पासून अशासकीय संस्थांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी आतापर्यंत पालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे; मात्र तरीही भटक्या कुत्र्यांची समस्या आणि त्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे पालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च न करता त्यांना निवारा केंद्रात ठेवावे, अशी मागणी भाजप सदस्या यामिनी जाधव, काँग्रेस सदस्य तुलिप मिरांडा आदी सदस्यांनी केली.
नसबंदी न झालेल्या कुत्र्यांची संख्या ५७,०८६ एवढी आहे. सर्व कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने, द वेल्फेअर ऑफ स्ट्रेडॉग्ज महालक्ष्मी या संस्थेला वार्षिक तीन हजार कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी वार्षिक खर्च ४६.५० लाख रुपये, तर तीन वर्षांसाठी १.३९ कोटी रुपये, दि बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल, परळ या संस्थेला वार्षिक १,४०० कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी वार्षिक खर्च २४.५० लाख रुपये तर तीन वर्षांसाठी ७३.५० लाख रुपये, इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, देवनार या संस्थेला सात हजार कुत्र्यांसाठी वार्षिक खर्च १.०८ कोटी रुपये तर तीन वर्षांसाठी ३.२५ कोटी रुपये, अहिंसा मालाड या संस्थेला ३,४०० भटक्या कुत्र्यांसाठी वार्षिक खर्च ५२.७० लाख रुपये तर तीन वर्षांसाठी १.५८ कोटी रुपये, उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन, मुलुंड या संस्थेला वार्षिक ९,१८० कुत्र्यांसाठी वार्षिक खर्च १.६० कोटी रुपये तर तीन वर्षांसाठी ४.८१ कोटी रुपये, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ या संस्थेला ५४० कुत्र्यांसाठी वार्षिक खर्च ०८.९१ लाख रुपये तर तीन वर्षांसाठी २६.७३ लाख रुपये, युथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल या संस्थेला ३,७८० कुत्र्यांसाठी वार्षिक खर्च ६६.१५ लाख रुपये तर तीन वर्षांसाठी १.९८ कोटी रुपये, वेटरनली थेरपेटिक्स एंडोसर्जरी अँड मेडिसिन सोसायटी, मुलुंड या संस्थेला ६,४८० कुत्र्यांसाठी वार्षिक खर्च एक कोटी रुपये तर तीन वर्षांसाठी ३.०१ कोटी रुपये, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी, मालाड या संस्थेला ५,१०० कुत्र्यांसाठी वार्षिक खर्च १.७८ कोटी रुपये तर तीन वर्षांसाठी ५.३५ कोटी रुपये, असे एकूण नऊ संस्थांना निर्बीजीकरणासाठी २३ कोटी ३० लाख रुपयांचे कंत्राट काम देण्यात येणार आहे.
भाजपच्या यामिनी जाधव यांनी, महापालिका भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना पुन्हा ज्या ठिकाणी पकडले त्याच ठिकाणी सोडत असल्याने त्यापेक्षा त्या कुत्र्यांना निवारा केंद्रात ठेवण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. पालिकेने भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्राची शोधाशोध सुरू केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
-------------
मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या ः ९०,७५७
निर्बीजीकरण न झालेल्या भटक्या कुत्र्यांची संख्या ः ३३,६७१
नर कुत्र्यांची संख्या ः २२,४४७
मादी कुत्र्यांची संख्या ः ११,२२४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.