२४ तासांत पाच अल्पवयीन मुली बेपत्ता

२४ तासांत पाच अल्पवयीन मुली बेपत्ता
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : मुंब्रा व दिवा परिसरातून एक-दोन, नाहीतर तब्बल पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहे. सर्व प्रकरणांमध्ये पालकांनी अनोळखी व्यक्तींवर अपहरणाचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ तासात नोंदवल्या या घटनांमुळे त्या-त्या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिलला सायंकाळी मुंब्रा येथील १७ वर्षीय मुलगी मावशीच्या घरी जाऊन कपडे घेऊन येते, असे सांगून घरातून निघून गेली; मात्र ती परत आली नाही. त्यानंतर २१ एप्रिलला दुपारी १४ वर्षीय मुलगी ही शाळेची परीक्षा देऊन घरी आल्यानंतर पुन्हा बाहेर पडली आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली. तर, २२ एप्रिलला सकाळी दिवा पूर्व येथील १७ वर्षीय मुलगी ही घरातून निघून गेली असून, तिचा अद्याप शोध लागलेला नाही. त्याच दिवशी सकाळी साडेआठ वाजता दिवा येथील १३ वर्षीय मुलगीही कोणालाही न सांगता घरातून निघून गेली.

२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मुंब्रा येथील १६ वर्षीय मुलगी ही, मैत्रीणीसोबत ठाण्याला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली; मात्र तीही परतलेली नाही, असे तक्रारीत नमूद केले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये त्या मुलींच्या पालकांनी त्यांना फूस लावून अनोळखी व्यक्तींनी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार अपहरणाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com