

वसईकरांचे जनआंदोलन स्थगित
तहसीलदार दीपक गायकवाड यांचे कारवाईचे संकेत
विरार, ता. २४ (बातमीदार)ः वसई तालुक्यातील प्रशासकीय डोळ्यांदेखत बेकायदेशीर माती-डेब्रिज भरावाच्या विरोधात २५ एप्रिल रोजी पुकारलेले जनआंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तहसीलदार दीपक गायकवाड यांनी विविध मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलन स्थगित केल्याची घोषणा सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसिल्वा यांनी केली.
वसईतील पाणथळ जागांवर बेकायदा भरावाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या वेळी तहसीलदार दीपक गायकवाड यांनी ज्या-ज्या ठिकाणी भरावाबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत, त्या सर्व प्रकरणांत टप्प्याटप्प्याने कठोर कारवाई केली जाईल. तसेच, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पाणथळ आणि कांदळवन असलेल्या जमिनी ७/१२ वर वन विभागाकडे हस्तांतरित करताना त्यावर कांदळवन असा स्पष्ट उल्लेख करण्याचे आश्वासन दिले. महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने आणि पुरेशी यंत्रणा नसल्याने ७/१२ वर बोजा चढवून संबंधित दोषींकडून दंडवसुली करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिला. तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून अनुपालन भंगाची नोटीस काढली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले. तसेच अशा प्रकरणी नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. या शिष्टमंडळात एलायस डिसिल्वा यांच्यासह मॅकेंझी डाबरे, रॉबर्ट लोपीस, डेनिस डिमेंटो आणि जेम्स घोन्साल्विस यांसारख्या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता.
--------------------------
बैठकीतील मुद्दे
- नालासोपारा-अचोळे येथील सर्व्हे क्रमांक ४६ मधील ९९,००० ब्रास भरावाच्या गाजलेल्या प्रकरणावर चर्चा करताना, नवीन मोजणी करून योग्य दंड आकारणी केली जाईल.
- नायगाव पूर्व आणि पश्चिम भागात कांदळवन नष्ट करून सुरू असलेल्या बेकायदा पार्किंगच्या जागेची चौकशी करण्याची मागणी मान्य केली.
- तक्रार प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही होण्यास होणारा ३-४ महिन्यांचा विलंब टाळताना इथून पुढे १० दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.