

‘कोकणचा राजा’ रुसला
ढगाळ वातावरण व वाऱ्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात हापूस पिकाला फटका
हंगामात साठ टक्के आंबा उत्पादन असल्याने बागायतदार चिंतेत
श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर) ः कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर निसर्गाची वक्रदृष्टी पडली आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेमतेम ६० टक्केच उत्पादन हाती येईल, या भीतीने बागायतदार धास्तावले आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील डोंगर उताराची जमीन आणि वातावरण दमट आणि कोरडे असल्याने हापूस आंब्याचे चांगले उत्पादन होते. तालुक्यातील एक हजार ९१० हेक्टर क्षेत्रात आंबा उत्पादन होत असून दरवर्षी सरासरी चार हजार तीनशे मेट्रिक टन इतके आंबा उत्पादन होते. तालुक्यात यंदा ९० टक्के भागात हापूसची लागवड होती. तर, उर्वरित क्षेत्रात रायवळ, केशर, पायरी या आंबा जातीची लागवड बागायतदारांकडून करण्यात आली आहे. परंतु, यंदा ऐन आंबा काढणीच्या वेळीस ढगाळ वातावरण, वारे आणि अवकाळी पावसामुळे हापूसचे उत्पादन घटणार असून साठ टक्के इतकेच उत्पादन हाती लागण्याची शक्यता आहे. यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, झाडावर असलेले उर्वरित फळ वाचवण्यासाठी बागायतदारांची लगबग सुरू झाली आहे. पीक खराब होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी अर्धवट तयार झालेला आंबाही झाडावरून उतरवण्यास सुरुवात झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीचा मारा
१ जोरदार वाऱ्यामुळे झाडांवरील फळे गळून पडत आहेत.
२ पावसाच्या थेंबांमुळे आंब्याच्या सालीवर काळे डाग पडत आहेत. यामुळे बाजारपेठेत योग्य दर मिळणे कठीण झाले आहे.
३ ढगाळ वातावरणामुळे करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला असून, अनेक ठिकाणी मोहोर काळा पडून गळू लागला आहे.
यंदाच्या हंगामात ढगाळ वातावरण, वारा व अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यावेळी जेमतेम पन्नास ते साठ टक्के आंबा उत्पादनाची शक्यता आहे. अवकाळी पाऊस, वारा, ढगाळ वातावरणामुळे झाडावरील फळ खराब होऊ नये यासाठी वेळेत फळे उतरवण्यास सुरुवात केली आहे.
- वैभव कर्णेकर, आंबा बागायतदार, श्रीवर्धन
कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी दिलेल्या शिफारशीनुसार आंबा पिकाची काळजी घेण्यात यावी.
- श्रद्धा डुंबरे, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन
फोटोओळ
श्रीवर्धन ः खराब वातावरणामुळे बागायतदारांनी झाडावरून आंबे काढण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.