

नवी मुंबईकरांना मोठा दिलासा
पाणीपट्टी थकबाकीवरील दंडांत ९० टक्के सवलत
वाशी, ता. २४ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दिलासादायक दोन ठराव महासभेत बहुमताने मंजूर केले आहेत. पालिकेच्या महासभेत पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी अॅम्नेस्टी योजना आणि अधिभोग प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या इमारतींसाठी वन टाइम रिलीफ स्कीम, असे दोन महत्त्वाचे ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले. सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या या प्रस्तावामुळे हजारो नागरिकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
महापालिकेच्या हद्दीत पाणीपट्टी, पाणी लाभकर आणि पाणीपुरवठा शुल्कावरील थकबाकी वसुलीस गती देण्यासाठी अॅम्नेस्टी योजना राबविण्याचा ठराव सभागृहात मांडण्यात आला होता. या योजनेअंतर्गत विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळापासून थकीत असलेली देणी भरण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळणार असून, महापालिकेच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासोबतच, गावठाण क्षेत्रातील गरजेपोटी उभारण्यात आलेली बांधकामे, अल्प उत्पन्न गटातील घरे तसेच किनारपट्टी विनियमन क्षेत्र किंवा इतर सक्षम प्राधिकरणांच्या मंजुरीअभावी अधिभोग प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या इमारतींसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २६७ अ अंतर्गत आकारण्यात आलेल्या दंडात्मक आकारणीमध्ये सवलत देण्यासाठी वन टाइम रिलीफ स्कीम लागू करण्याचा ठराव देखील महासभेत मंजूर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.