

एप्रिल-मेच्या उष्णतेत स्विमिंग पूल हाऊसफुल्ल
सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांची वाढती उपस्थिती; काही ठिकाणी सदस्यत्वासाठी प्रतीक्षा
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः मुंबईसह उपनगरांमध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून, या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी जलतरण तलावांकडे लोकांचा ओढा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईतील सर्वच जलतरण तलावांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मुंबई महापालिकेच्या विविध भागांतील जलतरण तलावांवर मोठी गर्दी दिसत आहे.
चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य ऑलिंपिक जलतरण तलाव, दादरमधील महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलाव, सरदार वल्लभभाई पटेल ऑलिंपिक जलतरण तलाव, दहिसर येथील श्री मुरबाळी देवी जलतरण तलाव तसेच मालाड, दादर, अंधेरी, वडाळा आणि विक्रोळी येथील तलावांमध्ये पोहण्यासाठी नागरिकांची उपस्थिती लक्षणीय दिसत आहे.
एका जलतरण तलावामध्ये विविध वेळांना साधारणतः १,००० ते २,००० सदस्यसंख्या असते. मात्र एप्रिल आणि मे या महिन्यांत ही संख्या सातत्याने वाढते. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढली आहे. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी एक दिवसाआड खासगी जलतरण तलावात पोहण्यासाठी जात असल्याचे शुभम भोसले या विद्यार्थ्याने सांगितले.
दरम्यान, अनेक नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करूनही त्यांना सदस्यत्व मिळण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय काही ठिकाणी तांत्रिक अडचणी किंवा दुरुस्तीमुळे जलतरण तलाव बंद असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे क्लबद्वारे चालवलेल्या खासगी जलतरण तलावांचा पर्याय अनेकांनी स्वीकारला आहे. मात्र अचानक वाढलेल्या गर्दीमुळे व्यवस्थापनावर ताण येत आहे.
महिनाभरात हजारहून अधिक सदस्य वाढले
प्रभादेवी येथील कामगार कल्याण मंडळाचा जलतरण तलाव ऑलिंपिक स्तरावरचा आहे. गेल्या मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत तब्बल १,१०० सभासद वाढले आहेत. नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत या जलतरण तलावाचे केवळ एक हजार सदस्य होते. नव्या सदस्यांना शुल्कामध्ये सवलत दिली आहे.
अचानक सदस्य वाढल्यामुळे आम्ही बॅचेस वाढवल्या आहेत. नव्या नोंदणीनुसार सुरक्षा रक्षक आणि प्रशिक्षकांची संख्यादेखील वाढवली आहे.
- मनोज बागले,
जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
उन्हाळ्याच्या दिवसांत जलतरण हा एक अत्यंत लोकप्रिय विरंगुळा ठरतो. आम्ही मित्र मिळून येथे धमाल करतो.
- सक्षम कदम, विद्यार्थी
या उष्णतेत जलतरण तलावावर काही निवांत क्षण घालवणे हा अत्यंत सुखद अनुभव आहे. काही काळ पाण्यात राहणे खूप छान वाटते.
- अहमद मालीम, ज्येष्ठ नागरिक
तापदायक ठरलेल्या या उन्हाळ्यात पोहणे हाच आमच्यासाठी एकमेव दिलासा आहे. गर्मीवर मात करण्यासाठी पोहणे हा एक उत्तम पर्याय ठरला आहे.
- सुदर्शनी डोंगरे, शिक्षिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.