

भरधाव वाहनांची जीवघेणी उसळी
वरई-परगाव रस्त्यावर खोलगट भागामुळे धोका
मनोर, ता. २४ ः वरई-परगाव रस्त्यावर गुंदावे गावाच्या हद्दीत वांद्री धरणाच्या कालव्यावरील मोरीच्या संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. संरक्षक भिंत कालव्याच्या बाजूने झुकल्याने डांबरी रस्त्यावरील खोलगट भागामुळे भरधाव वाहने उसळी घेत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. वरई ते पारगाव यादरम्यानच्या नऊ किलोमीटर अंतरापर्यंत अनेक ठिकाणी रस्ता खचला असून, रस्त्याची उंची वाढल्यामुळे मोऱ्यांच्या संरक्षक भिंती गायब झाल्या आहेत. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी माती मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक आणि रस्त्यालगतच्या खोदकामामुळे वरई-पारगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी मोऱ्यांच्या संरक्षक भिंती, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
------------------------
वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग
वरई-पारगाव रस्त्यामार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि सफाळे रेल्वे स्थानक जोडले गेले आहे. दहिसरतर्फे मनोर गावाच्या हद्दीतील वैतरणा नदीवरील एकेरी पुलामुळे पालघर जिल्हा मुख्यालयाकडे मस्तान नाका-मनोर मार्गे जाण्याचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे वसई-विरार, ठाणे आणि मुंबई येथून वरई-पारगाव रस्त्यावरून दहिसरमार्गे पालघरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.
--------------------------
रस्ता खचण्याचा धोका
मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भराव कामासाठी माती-मुरूम, खडी, रेडिमिक्स वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनांची वर्दळ वरई पारगाव रस्त्यावर वाढली आहे. अवजड वाहतुकीने गुंदावे गावाच्या हद्दीतील वांद्री धरणाच्या कालव्यावरील मोरीची संरक्षक भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. नावझे ते पारगाव यादरम्यान काही ठिकाणी मोऱ्यांना पडलेली भगदाडे मातीचा वापर करून बुजवली आहेत, पण संरक्षक भिंतीचा अभाव तसेच रस्त्यालगतच्या खोदकामामुळे रस्ता खचल्याचा धोका वाढला आहे.
--------------------------
वरई-पारगाव रस्त्यावर गुंदावे गावाच्या हद्दीतील कालव्यावरील मोरीच्या संरक्षक भिंतीची पाहणी करण्यात आली आहे. संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवले जाईल. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली आहे.
-सत्तारसिंग पावरा, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.