

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी पाड्यांवर आजही पाणीटंचाईची समस्या भेडसावत असून, ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी अनेक मैल डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईची समस्या सोडविण्याबरोबरच महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी सरकार व जिल्हा प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र आजही शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, दोन्ही तालुक्यांतील ११० गावपाड्यांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये जलजीवन मिशन, नळ पाणीपुरवठा योजना, पूरक नळ पाणीपुरवठा योजना, विंधन विहीर, कूपनलिका इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. तरीदेखील पाणीटंचाईग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत घट होत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत पाणीटंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने यंदाचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा आणि त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे.
गावपाड्यांत यंत्रणा सतर्क
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. टँकर पुरवठ्याचे नियोजन काटेकोरपणे राबविण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत.
शहापूरमध्ये भीषण स्थिती
सध्या शहापूर तालुक्यात २० गावे, ८६ पाडे अशा एकूण १०६ गावपाड्यांमध्ये २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच मुरबाड तालुक्यात एक गाव आणि तीन पाड्यांसाठी एक टँकर कार्यरत आहे. या माध्यमातून टँकरग्रस्त भागांतील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांमध्ये नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
- प्रकाश सासे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ठाणे जिल्हा परिषद
ग्रामस्थांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. ज्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होते त्या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
- रणजीत यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.