

ठाणे, ता. २४ (बातमीदार) : उन्हाळ्याच्या तडाख्यात ठाणेकरांनी कोकणच्या पारंपरिक रानमेव्याला पसंती दिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये जांभूळ, करवंद, कैरी, फणस, ताडगोळे, जाम, आंबा, काजू बोंड, हिरवे भाजीचे काजू, इलायची चिंच, रामफळ अशा विविध रानमेव्यांची रेलचेल असून, विशेषतः कोकणातून स्थलांतरित नागरिकांकडून या पदार्थांना मागणी वाढली आहे.
मे महिन्यापूर्वीच ठाणे बाजारपेठेत कोकणातील रानमेव्यांचे आगमन झाल्याने नागरिकांना ‘गावाकडची चव’ अनुभवण्याची संधी मिळत आहे. गावी जाणे शक्य नसलेल्या कोकणवासीयांसाठी हा रानमेवा जणू भावनिक ओढ पूर्ण करणारा ठरत आहे. त्यामुळे या पदार्थांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली आहे. या कोकणी रानमेव्यात कैरी २० ते ४० रुपये वाटा, हिरवे भाजीचे काजू पाव किलो २०० रुपये, एक डझन आंबे ६०० ते १२००, जाम वाटा ५० रुपये, करवंद २० रुपये वाटा, ताडगोळे एक डझन १०० रुपये अशा किमतीने उपलब्ध आहेत. विक्रेत्यांच्या माहितीनुसार, हिरवे भाजीचे काजू, कैरी, भाजीचा फणस आणि गोड फणसाचे गरे या पदार्थांना विशेष मागणी आहे. कोकणी खवय्ये या पारंपरिक चवींचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
आदिवासी विक्रेत्यांसाठी उत्पन्नाचा स्त्रोत
हा रानमेवा केवळ चवीपुरता मर्यादित नसून आदिवासी बांधवांसाठी उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील वाडा, येऊर, भिवंडी, कर्जत, पानखंड आदी भागांतून आदिवासी विक्रेते जंगलात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा हा रानमेवा गोळा करून ठाणे शहरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. शहरातील ठिकठिकाणी हे विक्रेते वाट्याने रानमेवा विकत आहेत. त्याला ग्राहकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. सध्या दर स्थिर असले तरी आगामी काळात महागाई वाढल्यास दरात वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
सध्याचे दर (रुपयांत)
जांभूळ (पाव) -२००
काजूचे बोंड (वाटा) - ५०
आंबा (डझन) - ६०० ते १२००
राज बोर (पाव) - १००
इलायची चिंच (वाटा) - ५०
कैरी (वाटा) - २० ते ४०
करवंद (वाटा) - २०
ताडगोळे (डझन) - १०० ते १२५
गोड फणसाचे गरे - ६० (पाव); १०० (अर्धा किलो)
हिरवे भाजीचे काजू (पाव किलो) - २००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.