

नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांचे लँडिंग सुखावह, पण पुढचा प्रवास कष्टदायक!
अॅप आधारित टॅक्सींचा विळखा; नेटवर्कची समस्या
अव्वाच्या सव्वा भाड्यामुळे प्रवाशांची लूट
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : नवी मुंबई विमानतळ देशातील प्रमुख केंद्र ठरत आहे. अशातच, प्रवाशांसाठी मात्र विमानतळ सोडणे हीच आता मोठी परीक्षा ठरत आहे. विमानतळावर उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागत असून, कॅबचालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
नवी मुंबई विमानतळ परिसरात अनेक कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने ओला-उबरसारखी अॅप आधारित टॅक्सी बुक करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने टोकन आधारित प्रणाली सुरू केली आहे. मात्र, ही प्रणालीच आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अॅपवरून कॅब बुक केल्यानंतर मोबाईलवर टोकन येते. त्यानंतर रांगेत उभे राहून आपला क्रमांक येईपर्यंत वाट पाहावी लागते. अनेक प्रवाशांना पिक-अप स्पॉटवर ४० ते ६० मिनिटे उभे राहावे लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. विमानतळावर उतरल्यानंतर लवकरात लवकर घरी पोहोचण्याची प्रवाशांची अपेक्षा असते. मात्र, या ठिकाणी तासभर टॅक्सीचीच वाट पाहावी लागते. त्यात भाडे इतके जास्त असते की सर्वसामान्यांचे कंबरडे मोडते, अशी प्रतिक्रिया एक त्रस्त प्रवाशाने व्यक्त केली.
रात्रीच्या सुमारास हजारोंचे बिल
कमी अंतराच्या किंवा स्वस्त दरातील कॅबचे पर्याय अॅपवर उपलब्ध नसल्याचे दाखवले जात असल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव महागड्या प्रीमियम राईड्स निवडाव्या लागत आहेत. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून वसई-विरार या भागात रात्रीच्या सुमारास जाण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी बससेवा नवी मुंबई विमानतळापर्यंत सुरू करण्यात आली असली तरी, ही बससेवा रात्री ११ नंतर बंद होत असल्याने खासगी टॅक्सीचालक प्रवाशांच्या हतबलतेचा फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांनंतर काय होणार?
मे महिन्यापासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यास प्रवाशांची संख्या दुप्पट होईल. तसेच, लवकरच २४ तास उड्डाणेही सुरू होतील. त्यानंतर येथील परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.