एसटी कर्मचारी परिवहनमंत्र्यांच्या दारी

एसटी कर्मचारी परिवहनमंत्र्यांच्या दारी
Published on

कल्याण, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित अडचणी व आर्थिक मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेशी संलग्न असलेल्या या संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. मंत्री सरनाईक यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करत, एस.टी. कर्मचारी हा राज्याच्या दळणवळणाचा कणा असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे स्पष्ट केले. निवेदनातील सर्व तांत्रिक व आर्थिक मुद्द्यांवर सकारात्मक विचार करून प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीला राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष पंकज वालावलकर, राज्य चिटणीस व्यंकटराव बिरादार, विधी सल्लागार आबासाहेब शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या पाठपुराव्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याचा आशावाद संघटनेचे ठाणे विभागीय अध्यक्ष योगेंद्र कदम यांनी व्यक्त केला.

प्रमुख मागण्या
आर्थिक लाभ : १ एप्रिलपासून प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीतील फरक तत्काळ अदा करावा. मेपासून सुधारित महागाई भत्ता लागू करून फरकाची रक्कम एकरकमी देण्याची मागणी.
वैद्यकीय सुविधा : एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी ‘कॅशलेस’ वैद्यकीय सेवा तातडीने सुरू करावी. आगारांमधील ४० ते ५० लाख रुपयांची प्रलंबित वैद्यकीय बिले निधी उपलब्ध करून तत्काळ अदा करावीत.
पास सवलत : कौटुंबिक व सेवानिवृत्ती पासेसवर प्रवास करताना अतिरिक्त रक्कम भरण्याची अट रद्द करावी.
प्रशासकीय सुधारणा : नवीन ‘बीएस-६’ वाहनांच्या स्पीडोमीटरनुसार धाव वेळ निश्चित करावी. सेवा ज्येष्ठतेनुसार कर्तव्ये देण्यासाठी ग्रुप रोटेशन प्रणाली लागू करावी.
महिला सुरक्षा : महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकर संपणाऱ्या शिफ्ट्स देण्याची व्यवस्था करावी.
पदोन्नतीचा प्रश्न : लिपिक पदोन्नतीसंदर्भातील जाचक अटी रद्द करून पदवीधर वाहकांना सरसकट पदोन्नती द्यावी.
विश्रांतीगृहांची दुरवस्था : हैदराबाद व वल्लभनगर (पुणे) येथील विश्रांतीगृहांमध्ये ढेकणांचा प्रादुर्भाव झाल्याने तातडीने पेस्ट कंट्रोल करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com