

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : ‘काही दिवसांत दुप्पट-तिप्पट नफा’चे प्रलोभन दाखवत फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या संघटित सायबर ठगी टोळीचा उल्हासनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘पांडा’ अॅपच्या माध्यमातून निष्क्रिय बँक खात्यांचा गैरवापर करून पैशांची गुंतागुंतीची साखळी तयार करणाऱ्या या टोळीतील दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.
या प्रकरणात अभिषेक नारकर ऊर्फ गोपाल आणि मोहम्मद रशीद फकीर बलोच ऊर्फ विक्की अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात उघड झालेली फसवणुकीची पद्धत अत्यंत धक्कादायक आहे. आरोपी समाज माध्यम, कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधत होते. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कमी वेळात मोठा नफा, असे सांगून ते विश्वास संपादन करत आणि नंतर गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी रक्कम उकळत होते.
‘पांडा’ नावाच्या अॅपचा वापर करून आरोपी निष्क्रिय बँक खात्यांची माहिती मिळवत होते. त्या खातेदारांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांचे चेकबुक, एटीएम कार्ड आणि इतर बँक तपशील ताब्यात घेतले जात. त्यानंतर त्यांच्या नावाने सिम कार्ड काढून ते जुन्या मोबाईलमध्ये वापरले जात होते. या माध्यमातून फसवणुकीची रक्कम विविध खात्यांमध्ये वळवून व्यवहारांची साखळी गुंतागुंतीची करण्यात येत होती, त्यामुळे तपास करणे कठीण होत होते. सध्या या दोघांचा ताबा उल्हासनगर पोलिसांकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडून १६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
दोन घटना उघडकीस
या टोळीने उल्हासनगरातील झूलेलाल मंदिर परिसरातील वीरेन माखीजा यांना ११ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच लाख २५ हजार रुपये गोठवण्यात यश मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी मिरा रोड पोलिसांनी नालासोपारा येथील एका लॉजवर छापा टाकून पाच आरोपींना अटक केली होती, त्यामध्ये या दोन मुख्य आरोपींचाही समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.