

दुर्वेस येथे स्वामिनारायण मंदिरात
विविध देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा
पालघर, ता. २४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील दर्वेस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बीएपीएस स्वामिनारायण मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त गुरुवारी (ता. २३) आणि शुक्रवारी (ता. २४) भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्वामिनारायण मंदिरात विविध देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत दुर्वेस गावात ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज, योगीजी महाराज, ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज यांनी या भागात सत्संग व आध्यात्मिक कार्याला चालना दिली. परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने हे भव्य मंदिर साकार झाले. तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सद्गगुरू भक्तिप्रिय स्वामी आणि सद्गगुरू संत विवेकसागरस्वामी यांच्या हस्ते पार पडला. या वेळी वनमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार हेमंत सवरा यांनी सोहळ्यास हजेरी लावली. त्याचबरोबर १,००० भाविक आणि २०० संतही उपस्थित होते. या महोत्सवानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक विधी, सत्संग सभा, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तांसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी (ता. २३) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विश्वशांती स्वामिनारायण महायज्ञात चारशेहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. सायंकाळी काढलेल्या भव्य नगर यात्रेत सजवलेल्या रथांसह मूर्तींची शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर लाइट, साउंड व ड्रोन शोद्वारे मंदिराचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व उलगडण्यात आले तसेच कीर्तन आराधनेतून भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
---------
भव्य वास्तुकलेचा नमुना
सुमारे १०.५ एकर परिसरातील हे मंदिर पारंपरिक नागर शैलीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराची लांबी १९५ फूट, रुंदी १२९ फूट तर उंची ७७ फूट आहे. मंदिरात तीन शिखरे, एक मध्यवर्ती घुमट, ११ घुमट, ५८ कोरीव स्तंभ, २० अलंकारिक तोरणे, ६७ झरोके तसेच लाकडी कोरीवकाम केलेली सहा भव्य प्रवेशद्वारे आहेत.
--------------------
विविध देवी-देवतांचे होणार दर्शन
११ एकर परिसरात उभारलेले मंदिर पारंपरिक नागर शैलीतील वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण असून, त्यामध्ये तीन भव्य शिखरे, मुख्य घुमट, ११ लहान घुमट, ५८ नक्षीदार स्तंभ, २० तोरणे आणि सहा भव्य प्रवेशद्वारे आहेत. सुमारे एक हजार भाविकांसाठी आसनव्यवस्था असलेले सभागृह येथे उभारण्यात आले आहे. तसेच मंदिराच्या गर्भगृहात श्री स्वामिनारायण भगवान (अक्षर-पुरुषोत्तम महाराज), राधा-कृष्ण, सीता-राम, शिव-पार्वती, हनुमान, गणपती आणि नीलकंठ वर्णी यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.