

नालेसफाईच्या मुद्द्यावर प्रशासन फैलावर
नवी मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधींचा पारदर्शकतेसाठी आग्रह
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (ता. २४) पार पडलेल्या तहकूब सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. शहरात नालेसफाई सुरू आहे की केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत, असा संतप्त सवाल करीत विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी प्रभागनिहाय समस्यांचा पाढाच सभागृहात वाचला. सहा हजार ७०४ कोटींच्या अवाढव्य अर्थसंकल्पाची तरतूद असूनही मूलभूत स्वच्छतेसाठी नागरिकांना संघर्ष का करावा लागतो, अशी विचारणा या वेळी करण्यात आली.
महासभेत नालेसफाईच्या ठरावावर चर्चा सुरू असताना नगरसेवकांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र शब्दांत प्रहार केला. शिवसेनेचे नगरसेवक जगदीश गवते यांनी सांगितले, की दिघा येथील मुकुंद कंपनीच्या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी भरते. केवळ वरवरची सफाई करून हा प्रश्न सुटणार नाही. येथील मोठ्या नाल्यांचे डीप क्लिनिंग आवश्यक आहे. तर भाजपचे नगरसेवक अशोक पाटील यांनी ऐरोली विभागातील होल्डिंग पाँडची दुरवस्था अधोरेखित केली. ऐरोली येथील होल्डिंग पाँडमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ उपसून काढण्यात यावा आणि केवळ सफाई करून न थांबता त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. नवी मुंबईकरांना पावसाळ्यात सुरक्षित ठेवण्यासाठी आता प्रशासनाला अवघ्या काही दिवसांत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
एमआयडीसी क्षेत्रात अनेक ठिकाणी नाल्यांवर स्लॅब टाकून गाळे बांधण्यात आले आहेत. नाल्यावर स्लॅब असल्यावर नाले साफ कसे होणार? नवी मुंबई हे सुनियोजित शहर असूनही इथे पाणी का साचते, असा सवाल भाजप नगरसेवक सुधाकर सोनवणे यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी ठाणे-बेलापूर मार्गावरील जलमय होणाऱ्या भागांकडे त्यांनी लक्ष वेधले. एमआयडीसीच्या डोंगरावरून येणारे पाणी ठाणे-बेलापूर रस्त्यावर रिलायबलजवळ साचते. तेथील रस्त्याची उंची वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष पाहणी करावी
सभागृह नेते सागर नाईक प्रशासनाला कडक निर्देश देताना म्हणाले, की शहरात कुठे कुठे पाणी साचणार आहे याबाबत प्रशासनाने तत्काळ अहवाल द्यावा. सखल भागात पाणी साचता कामा नये. नालेसफाईनंतर काढलेला गाळ तिथेच न ठेवता तत्काळ उचलला पाहिजे. नाला व्हिजनच्या माध्यमातून होल्डिंग पाँडचा विषय येत्या एक-दोन महिन्यांत सभागृहात आणला जाईल आणि प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी.
खारफुटी अन्यत्र हलवून नाल्यांची सफाई
नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासनाची बाजू मांडली. खारफुटीमुळे नालेसफाईत येणारे अडथळे दूर करण्यासाठी नामदार गणेश नाईक वनमंत्री असताना विशेष प्रयत्न झाले आहेत. आता खारफुटी अन्यत्र हलवून नाल्यांची सफाई करणे शक्य होणार आहे. एपीएमसी मार्केटमधील नालेसफाई त्यांच्या प्रशासनाने केली नाही तर महापालिका ती पूर्ण करेल. नालेसफाईनंतर काढलेला गाळ तीन ते चार दिवसांत उचलण्याचे आदेश दिले असून, तसे न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली जाईल. तसेच धोकादायक इमारती खाली करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौरांचा १५ मे रोजीचा डेडलाइन दौरा
महासभेचा समारोप करताना महापौर सुजाता पाटील यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला. प्रशासनाने सर्व नालेसफाईची कामे अधिक गतिमानतेने करावीत. १५ मे रोजी मी स्वतः दिघा ते बेलापूर या संपूर्ण पट्ट्याचा पाहणी दौरा करणार आहे. स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन त्या दिवशी ऑन ग्राउंड रिपोर्ट घेतला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
एकूण मोठे नाले : २८
होल्डिंग पाँड : १४ (ज्यांची क्षमता गाळामुळे ८० टक्क्यांनी घटली आहे.)
मुदत : १५ मेपर्यंत सर्व मुख्य नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचे आदेश.
अर्थसंकल्पीय तरतूद : २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नागरी पायाभूत सुविधांसाठी ३,६९३ कोटींची तरतूद केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.