

वाढवण भूसंपादन प्रक्रियेत गैरप्रकार?
अधिकच्या रकमेसाठी कृषी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
पालघर, ता. २४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाशी संबंधित वाढवण महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत झाडांच्या मोबदल्यात गैरप्रकार होत असल्याचे आरोप समोर आले आहेत. अधिकचा मोबदला मिळवून देण्याच्या प्रलोभनाने काही कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हाताशी धरत मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. वाढवण महामार्गामुळे डहाणू व पालघर या दोन तालुक्यांतील २४ गावे बाधित होत असून, या गावांतील जमीन, झाडे व बांधकामांसाठी प्रशासनाकडून मोबदला निश्चित करण्यात आला आहे. या प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांनी लहान रोपे मोठी झाडे असल्याचे दाखवून जादा मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी लागवड नसलेल्या क्षेत्रात झाडे दाखविण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष फळझाडे असलेल्या शेतकऱ्यांना विसंगत नोटिसा मिळाल्याची तक्रार आहे.
२० टक्के रकमेची मागणी?
मोबदला वाढवून देण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी संबंधित रकमेच्या २० टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकारामुळे प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिक विनीत प्रभाकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच वाढीव मोबदल्यासाठी देण्यात आलेल्या संशयास्पद नोटिसा तत्काळ रद्द कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्याचा गंभीर आरोप
बाधित गावातील एका शेतकऱ्याने एक ते दोन फूट उंचीची ७५ रोपे लावली. त्यापैकी केवळ २८ झाडांचा मोबदला मिळणार असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित झाडांबाबत विचारणा केली असता, इतरांनी २० टक्के दिल्यामुळे त्यांना पूर्ण मोबदला मिळाला, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे. यानंतर शेतकऱ्याने परिसरातील इतर नोटिसांची पाहणी केली असता, काही ठिकाणी झाडे कमी असूनही किंवा लागवड नसतानाही ५० ते ६० लाख रुपयांपर्यंत मोबदला मंजूर झाल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाढवण प्रकरणातील तक्रारींचे निवेदन वरिष्ठ कार्यालयातून चौकशीसाठी प्राप्त झाले आहे. तक्रारदारांना अधिक माहिती सादर करण्यास सांगितले असून, ती मिळाल्यानंतर या संपूर्ण प्रकाराची तपासणी करण्यात येईल.
- विशाल खत्री, उपविभागीय महसूल अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.