

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : संत ज्ञानेश्वरनगर भागात सार्वजनिक स्वच्छतागृह आणि नाल्याशेजारी शिवसेना नगरसेवकांच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या आरोग्य केंद्राचा वाद चिघळल्यानंतर शुक्रवारी (ता. २४) शिवसेनेच्या (ठाकरे गट) शिष्टमंडळाने पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. दुसरीकडे आरोग्य केंद्र हवे पण नाना-नानी पार्कच्या जागी नको, अशी भूमिका भाजप आमदार संजय केळकर यांनी घेत या वादात उडी घेतली. तसेच नाना-नानी पार्क हटवू देणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष्मान आरोग्य मंदिरे उभारण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत संत ज्ञानेश्वरनगर भागात नाना-नानी पार्कच्या पडीक जागेवर आरोग्य केंद्र उभारण्यासाठी शिवसेना नगरसेवक अनिल भोर यांनी पाठपुरावा केला. हे केंद्र सार्वजनिक स्वच्छतागृह आणि नाल्याशेजारी असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुस्पे यांच्यासह स्थानिकांनी या जागेवर केंद्र उभारण्यास कडाडून विरोध केला. गुरुवारी (ता. २३) या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही शिवसेनांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर पोलिस बंदोबस्तात आरोग्य केंद्राचे कंटेनर स्वच्छतागृह आणि नाल्याशेजारी ठेवण्यात आले. या जागेची शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पाहणी केली. त्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांची दिघे आणि नगरसेवक खुस्पे यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी या केंद्राच्या जागेला विरोध केला.
संबंधित जागेचे फोटो पाहिल्यानंतर आयुक्त राव यांनी तातडीने या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेट देत पाहणीचे निर्देश दिल्याचे या भेटीनंतर दिघे यांनी सांगितले. तसेच ही जागा अयोग्य असल्याचे सकृतदर्शनी समोर येत आहे. दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास आयुक्त स्वतः दौरा करून हा मुद्दा निकाली काढणार असल्याचे आश्वासन राव यांनी दिल्याचे दिघे यांनी नमूद केले.
सत्ता चालवणारे दुसरे!
भाजप सत्तेत सहभागी झाली आहे, पण सत्ता चालवणारे दुसरे आहेत. त्रुटी आढळून आल्या तर विरोधकांची भूमिका बजावू आणि लोकहिताच्या कामांना पाठिंबा देऊ, अशी भूमिकाही स्पष्ट केली. ज्ञानेश्वरनगर येथे जवळपास उद्यान नसल्याने येथील लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांना नाना-नानी पार्क हवे आहे. त्यांची मागणी डावलून इतरांचे हितसंबंध जपत आरोग्य केंद्राचा कंटेनर जबरदस्तीने आणण्यात आला. याबाबत मी आयुक्त आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यांनी मान्य केल्यानंतरही कंटेनर आणण्यात आला, हे चुकीचे झाले आहे. अधिकारी लोकांचे काम करण्याऐवजी राजकारण करू लागले आहेत, अशी टीका करीत केळकर यांनी पार्क हटवू देणार नाही, याबाबत पुनरुच्चार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.