येऊरमधील बिबट्याला स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली

येऊरमधील बिबट्याला स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : मिरा-भाईंदर परिसरात सध्या सुरू असलेल्या प्रताप सरनाईक प्रीमियर लीग या टेनिस क्रिकेट स्पर्धेत ‘बिट्टू बॉस’ हे एक वेगळेच आकर्षण पाहायला मिळत आहे. येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लाडक्या बिबट्याच्या स्मृतिप्रित्यर्थ तयार करण्यात आलेले हे शुभंकर (मॅस्कॉट) सध्या स्पर्धेचे प्रमोशन करताना सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

२०१९मध्ये ठाण्यातील येऊरच्या जंगलात सापडलेल्या या पोरक्या बछड्याला मंत्री प्रताप सरनाईक यांनी दत्तक घेतले होते. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या ‘बिट्टू’ या टोपणनावावरून त्याचे ‘बिट्टू बॉस’ असे नामकरण झाले होते. गेल्या महिन्यात २१ मार्चला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बिट्टू बॉस’ या सहावर्षीय बिबट्याचे आजारपणाने निधन झाले. बिट्टूच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. त्याची आठवण अशीच पुसली जाऊ नये आणि लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करीत वाढलेल्या या ‘फायटर’ची ऊर्जा सर्वांना मिळावी, या उद्देशाने आयोजकांनी पीएसपीएलच्या निमित्ताने त्याला ‘शुभंकर’ म्हणून पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. हुबेहूब ‘बिट्टू बॉस’सारखा दिसणारा हा मॅस्कॉट सध्या मैदानावर प्रेक्षकांचे, विशेषतः लहान मुलांचे लक्ष वेधून घेत असून, स्पर्धेची एकंदर ऊर्जा टिकवून ठेवण्याची जबाबदारी तो लीलया पार पाडत आहे. मैदानावर, समाज माध्यमांवर आणि स्पर्धेच्या विविध उपक्रमांमध्ये दिसणारा ‘बिट्टू बॉस’चा मॅस्कॉट केवळ एक प्रतीक नसून, तो एक भावनिक नाते पुन्हा जागे करणारा दुवा ठरत आहे.

नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय
मिरा-भाईंदर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर आज (ता. २४)पासून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त टेनिस क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २९ एप्रिलदरम्यान होत असलेल्या या स्पर्धेत देशभरातील १६ संघांसह ठाणे, मिरा-भाईंदरमधील १६ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या प्रत्येक क्षणी ‘बिट्टू बॉस’चं शुभंकर खेळाडूंना ऊर्जा देत आहे. विशेष म्हणजे या मॅस्कॉटच्या माध्यमातून केवळ स्पर्धेचे प्रमोशनच होत नाही, तर वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण करण्याचाही संदेश दिला जात आहे. ‘बिट्टू बॉस’ हा एकेकाळी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आज त्याच नावाने तयार झालेलं शुभंकर पुन्हा एकदा लोकांना त्या आठवणींशी जोडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com