

नवी मुंबईत विकासकामांना वेग
स्थायी समितीच्या सभेत ४४ प्रस्तावांना मंजुरी
वाशी, ता. २४ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकाच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (ता. २४) बेलापूर येथील मुख्यालयात पार पडली. सभापती अशोक पाटील यांच्या या सभेत शहरातील विविध पायाभूत सुविधा, मलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक सुविधा तसेच आरोग्यविषयक प्रकल्पांशी संबंधित ४४ विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नवी मुंबईतील विकासकामांना मोठी चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सभेत तुर्भे विभागातील सेक्टर १८ येथील १०० एमएलडी मलप्रक्रिया केंद्राशी संबंधित मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच कोपरखैरणे विभागात मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या जलस्रोतांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मोरबे धरण प्रकल्पाच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामालाही मान्यता देण्यात आली.
या सभेत प्रशासनाने शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करीत विविध विभागांतील प्रलंबित कामांना गती देण्यावर भर दिला. विशेषतः पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटार दुरुस्ती आणि पाणी निचरा व्यवस्थेची कामे वेळेत पूर्ण करण्याचे संकेत या निर्णयांतून मिळत आहेत. स्थायी समितीच्या मंजुरीमुळे या सर्व कामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, नवी मुंबईकरांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
चौकट
प्रस्तावांना हिरवा कंदील
नेरूळ, बेलापूर, वाशी, घणसोली आणि ऐरोली या विविध विभागांमध्ये गटार दुरुस्ती, नवीन नाले बांधकाम, पदपथ व रस्ते सुधारणा अशा कामांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली. अनेक ठिकाणी जुन्या व निकृष्ट मलनिस्सारण वाहिन्या बदलून नवीन व्यवस्था उभारण्याचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले. याशिवाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्पांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत विविध ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण व परिसर विकासाची कामे हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. शाळा, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे तसेच विभागीय कार्यालयांमधील दुरुस्ती, सुशोभीकरण आणि आवश्यक सुविधा उभारण्याचे प्रस्तावही सभेत मंजूर झाले. तसेच बिप्लेन कॅथलॅब आणि एमआरआय सेंटरसारख्या आधुनिक आरोग्य सुविधांसाठी वित्तीय मंजुरी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.