

खरातच्या पत्नीची उरणमध्ये जमीन
अटकेच्या दिवशीच व्यवहार पूर्ण; ५८ लाखांत जमीन खरेदी
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : राज्यभरात गाजत असलेला भोंदू अशोक खरात याचे आता उरण कनेक्शन उघड झाले आहे. खरात याच्या फरार पत्नीच्या नावावर उरणमध्ये २० गुंठे जमीन असून ५८ लाख ५० हजार रुपयांत हा व्यवहार पार पडला असून खरातला अटक झालेल्या दिवशीच हा व्यवहार पूर्ण झाल्याचे नाेंदीतून स्पष्ट झाले आहे. महसूल आणि नोंदणी विभागाच्या या तत्परतेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उरण तालुक्यातील चाणजे गावातील सर्व्हे क्रमांक ३७१/३ (क्षेत्र ०.२०.०० आर) ही जमीन अस्मिता अविनाश म्हात्रे आणि कैलास मिश्रीमल शहा यांच्याकडून कल्पना अशोक खरात हिच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली. १२ मार्च २०२६ रोजी हे खरेदीखत नोंदवले गेले. विशेष म्हणजे खरातला अटक झालेल्या १७ मार्च २०२६ या दिवशीच तलाठी सजा चाणजे यांनी या व्यवहाराची वर्दी नोटीस चावडीवर प्रसिद्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वसामान्यांना सातबाऱ्यावर नाव चढवण्यासाठी वर्षानुवर्षे तहसील कचेरीचे उंबरठे झिजवावे लागतात; मात्र या हायप्रोफाईल गुन्हेगाराच्या प्रकरणात महसूल यंत्रणेने चक्रे अत्यंत वेगाने फिरवली. १३ एप्रिल २०२६ रोजी म्हणजेच महिना पूर्ण होण्याआधीच फेरफार क्रमांक ८३५१ मंजूर करण्यात आला. आरोपीची पत्नी फरार असताना तिची ओळख कशी पटवण्यात आली आणि इतक्या वेगात फेरफार कसा मंजूर झाला, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
-----
चाणजे येथील अश्विनी अविनाश म्हात्रे यांची ५८ गुंठे जागा आहे. त्यापैकी २० गुंठे कल्पना खरात हिने १२ मार्चला विकत घेतली होती. अपुऱ्या कागदपत्रांअभावी या व्यवहाराच्या खरेदीखताची दस्तनोंदणी ६ एप्रिलला रद्द करण्यात आली आहे.
- उद्धव कदम, तहसीलदार, उरण
विशेष तपास पथकामार्फत चौकशी करा!
दुय्यम निबंधक कार्यालय, तहसीलदार आणि तलाठी यांच्या भूमिकेवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. फरार महिलेची ओळख पडताळणी कोणी केली, अटकेच्या दिवशीच नोटीस कशी प्रसिद्ध झाली, हा व्यवहार करण्यासाठी कोणत्या बड्या हस्तीचा वरदहस्त होता, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.