

ठाण्यात पित्याचे
बाळासह पलायन
पित्याविरुद्ध आईची पोलिसांत तक्रार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : अबुधाबी येथून भारतात कुटुंबासह आल्यावर एका पित्यानेच आपल्या तीन महिन्यांच्या बाळासह पलायन केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. याप्रकरणी मुंब्रा येथील २९ वर्षीय महिलेने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही अबुधाबी (यूएई) येथे पतीसोबत राहत होती. बुधवारी (ता. २२) ती ३८ वर्षीय पती आणि तीन महिन्यांच्या मुलासह मुंबईकडे रवाना झाली. गुरुवारी (ता. २३) पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचल्यानंतर ती मुंब्रा येथे आई-वडिलांकडे जाण्यासाठी कारने निघाली. दरम्यान, पहाटे माजिवाडा येथील एका हॉटेलजवळ गाडी थांबवून पतीने ‘मित्राला बाळ दाखवायचे आहे,’ असे सांगत बाळ घेण्याचा आग्रह केला; मात्र महिलेने नकार दिल्यानंतरही तिच्या पतीने जबरदस्तीने बाळ आपल्या ताब्यात घेतले आणि गाडीतून बॅगसह उतरून जवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या कारमध्ये बसून तेथून पसार झाला. त्या बॅगेमध्ये बाळाचा पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे होती. घटनेनंतर महिलेने पतीच्या मोबाईलवर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप बाळाचा शोध लागलेला नाही. बाळाचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.