

ओशिवरातील सिटी इंटरनॅशनल शाळा अचानक बंद
कारवाईची मागणी, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
जोगेश्वरी, ता. २६ (बातमीदार) : ओशिवरा येथील सिटी इंटरनॅशनल शाळा प्रशासनाने अचानक बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून शाळा प्रशासनावर तातडीने फौजदारी तसेच प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ओशिवरा आणि गोरेगाव परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेत अनेक वर्षांपासून शिक्षण घेत आहेत. प्रवेशाच्या वेळी शाळा प्रशासनाने पालकांकडून सुमारे ४० हजार रुपयांची ‘देणगी’ घेत इयत्ता दहावीपर्यंत अखंड शिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच मानसिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याशिवाय, शाळा प्रशासन पालकांना अधिकृत शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) न देता ईमेलद्वारे ‘ट्रान्स्फर सर्टिफिकेट’ पाठवत असल्याचे समोर आले आहे. शाळा बंद झाल्याची अधिकृत नोंद टाळण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. तसेच, पालकांकडून घेतलेल्या देणगी व फीबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.
या अचानक निर्णयामुळे विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश मिळवणे कठीण झाले असून पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी खासदार वायकर यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. खासदार वायकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शाळा प्रशासनावर तत्काळ फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी, पालकांकडून घेतलेली देणगी व्याजासह परत करावी, तसेच ‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार बाधित विद्यार्थ्यांचे तातडीने शैक्षणिक पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना रीतसर शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. शाळेच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देता कामा नये. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.