‘मामलेदार मिसळ’ जुनी वास्तू इतिहासजमा

‘मामलेदार मिसळ’ जुनी वास्तू इतिहासजमा
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणेकरांच्या आयुष्यातील अनेक आठवणी जपणारी, चवीसोबतच भावनांचाही वारसा देणारी, ठाणेकरांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारी आणि शहराच्या ओळखीचा भाग बनलेली मामलेदार मिसळची जुनी वास्तू आता इतिहासजमा झाली आहे. तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासासाठी करण्यात आलेल्या कारवाईत हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले आहे. ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
१९५०च्या दशकात एका छोट्या दुकानातून सुरू झालेली ही मिसळ हळूहळू ठाण्याची ओळख बनली. तहसील कार्यालयात येणारे अधिकारी आणि मामलेदार येथे मिसळ खाण्यासाठी येत असत. त्यातूनच ‘मामलेदार मिसळ’ हे नाव प्रचलित झाले आणि पुढे ते एक ब्रँड बनले. तिखट, झणझणीत कट आणि घरगुती चव यामुळे या मिसळीने ठाणेकरांच्या मनात खास स्थान निर्माण केले. लहानशा जागेत सुरू असलेल्या या दुकानाबाहेर सकाळपासून रात्रीपर्यंत ग्राहकांच्या रांगा लागायच्या. दरम्यान, तहसील कार्यालय, ठाणेनगर पोलिस ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी हा परिसर रिकामा करण्यात आला. त्यामुळे या परिसरातील ‘मामलेदार मिसळ’चे दुकानही पाडण्यात आले आहे. सध्या हे दुकान जवळच दुसऱ्या ठिकाणी सुरू करण्यात आले असून पुनर्विकासानंतर नव्या इमारतीत पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती आहे. नवीन सुविधा, आधुनिक इमारती उभ्या राहणार असल्या तरी जुन्या वास्तूतील त्या चवीची आठवण, तिथे रंगणाऱ्या गप्पा आणि माहोल मात्र पुन्हा अनुभवता येईल का, हा प्रश्न प्रत्येक ठाणेकराच्या मनात कायम राहणार आहे.

राजकीय दिग्गजांचाही कट्टा
अनेक राजकीय दिग्गजांनीही या ठिकाणी भेट दिली होती. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांनी येथे मिसळीचा आस्वाद घेतला होता. राज ठाकरे ठाण्यात आले की येथे येणे हा त्यांचा ठरलेला कार्यक्रम असायचा. यामुळे हे ठिकाण केवळ खाद्यपदार्थापुरते मर्यादित न राहता, ठाण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com