अखेर निर्बीजीकरणाने भटक्या श्वानांना चाप

अखेर निर्बीजीकरणाने भटक्या श्वानांना चाप
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : शहरात दिवसेंदिवस भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला असून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. भटक्या श्वानांना आळा बसावा, यासाठी श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येते. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून वागळे इस्टेट येथे श्वानांचे शस्त्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले होते; मात्र हे केंद्र जवळपास तीन ते चार वर्षांपासून काही तांत्रिक कारणामुळे बंद होते. त्यामुळे श्वानांच्या शस्त्रक्रिया करण्यात अडचणी येत होत्या. याची दाखल घेत, पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अखेर हे केंद्र सुरू केले आहे. मागील आठवडाभरात सुमारे १०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अपुऱ्या साहित्य सामग्री व मनुष्यबळामुळे अनेकदा भटक्या श्वानांना आळा बसविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तीन ते चार वर्षांपासून भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रियादेखील बंद असल्यामुळे भटक्या श्वानांचा प्रश्न जटिल झाला होता. याची दाखल घेत, ठाणे महापालिका प्रशासनाने श्वान नियंत्रण विभागाच्या सक्षमीकरणावरदेखील विशेष भर दिला आहे. श्वान नियंत्रण विभागाला श्वान पकडण्यासाठी वाहन खरेदी करण्याबरोबरच श्वान केंद्राची डागडुजी करणे, भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करणे आदींसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यात ठाणे पालिकेचे वागळे इस्टेट येथील श्वान निर्बीजीकरण केंद्राचेदेखील सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

हे केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हालचाली सुरू करण्यात आल्या. अशातच मागील आठवड्यात हे केंद्र सुरू झाल्याने श्वानप्रेमींनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मागील आठवड्याभरात सुमारे १०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

क्षमतेमध्ये वाढ
ठाणे पालिकेचे वागळे इस्टेट येथील श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. या केंद्रात निर्बीजीकरणासाठी ७४ श्वान ठेवता येतील इतकी क्षमता आहे; मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून निर्बीजीकरण बंद असल्याने शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत वाढ होत आहे. अस्तित्वात असलेली संख्या अपुरी पडत असल्याचे निदर्शनास आल्याने येथील श्वान ठेवण्याची क्षमता १४ने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ७४वरून श्वान ठेवण्याची संख्या ८८ झाली आहे.

खर्चिक बाब
प्रत्येक श्वानावर सहा ते सात हजार रुपये खर्च होतो. शस्त्रक्रियेसोबतच, श्वान बरा होण्यासाठी त्याला आठवडाभर निवारागृहात ठेवावे लागते. यामध्ये श्वानांना निवारागृहांपर्यंत नेण्या-आणण्याचाही खर्च येतो. कधीकधी, एका श्वानामागे १० हजारांपर्यंत खर्च येतो. श्वानांना लस देणे, त्यांचे खाद्य तसेच प्रत्येक श्वानाच्या लसीकरणासाठी ४०० रुपये लागतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका श्वानावर खर्च करणे, हे श्वानपालक आणि श्वानप्रेमीसाठी खर्चिक बाब ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com