

वाशी, ता. २६ (बातमीदार) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींबाबत सतर्कतेचे आवाहन केले आहे. ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतींचे लेखापरीक्षण करणे अनिवार्य असून, ते नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअरमार्फतच करून घेण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
महापालिका कार्यक्षेत्रातील इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार धोकादायक आढळलेल्या इमारतींना प्रवर्गनिहाय घोषित केले जाते. विशेषतः ‘सी-१’ प्रवर्गातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांना नोटीस बजावली जाते. तसेच, ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे लेखापरीक्षण दरवर्षी एका वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे, तर सहकारी गृहनिर्माण संस्था नियमांनुसार १५ ते ३० वर्षांच्या इमारतींसाठी दर पाच वर्षांनी आणि ३० वर्षांवरील इमारतींसाठी दर तीन वर्षांनी ऑडिट करणे आवश्यक आहे. अलीकडे काही ठिकाणी इमारतींमध्ये अंतर्गत फेरबदल करताना केलेल्या कामांमुळे दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुरुस्ती किंवा सक्षमीकरण कामांसाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या कामांसाठी परवानगीची आवश्यकता नसली तरीदेखील ती कामे नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या देखरेखीखालीच करावीत, तसेच संबंधित सोसायटीला त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करून काम केल्यास आणि भविष्यात दुर्घटना घडल्यास संबंधित सदनिकाधारक, तसेच सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना जबाबदार धरले जाणार असल्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.