

वाशी, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी वाशी आणि ऐरोली येथील रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक कॅथलॅब तसेच वाशी येथे एमआरआय केंद्र उभारण्याच्या प्रस्तावांना शुक्रवारी (ता. २४) झालेल्या स्थायी समिती बैठकीत वित्तीय मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे हृदयविकार, मेंदुविकार तसेच इतर गंभीर आजारांवरील निदान व उपचार सेवा शहरातच तुलनेने कमी दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांचे खासगी रुग्णालयांवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा आहे.
वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात सुमारे ४६.४६ कोटींच्या खर्चातून ‘बाय-प्लेन कॅथलॅब’ उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ऐरोली येथील रुग्णालयात सुमारे १४.९५ कोटींच्या खर्चातून ‘सिंगल प्लेन कॅथलॅब’ उभारण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे हृदयविकार आणि मेंदुविकारांवरील तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक सुविधा महापालिकेच्या रुग्णालयांत उपलब्ध होणार आहेत. सध्या अशा प्रकारच्या उपचारांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत असून, त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. नव्या सुविधांमुळे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्ट्रोकवरील उपचार तसेच रक्तवाहिन्यांशी संबंधित विविध प्रक्रिया शहरातच करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वाशी येथील रुग्णालयात एमआरआय केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. हे केंद्र कंत्राटी पद्धतीने पुढील १० वर्षांसाठी चालविण्यात येणार असून, सुमारे ३३.१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याअंतर्गत मेंदू, मणका, सांधे, पोट तसेच रक्तवाहिन्यांच्या विविध तपासण्या उपलब्ध होणार आहेत.
तपासणीचे दर नियंत्रित
विशेष म्हणजे महापालिका हद्दीतील रुग्णांसाठी एमआरआय तपासणीचे दर नियंत्रित ठेवण्यात आले आहेत. पहिल्या वर्षात साध्या एमआरआय तपासणीसाठी १,७७५ रुपये, तर कॉन्ट्रास्टसह तपासणीसाठी १,८१० रुपये आकारले जाणार आहेत. पुढील वर्षांमध्ये दरात टप्प्याटप्प्याने वाढ होऊन दहाव्या वर्षात हे दर अनुक्रमे २,१२२ व २,१६३ रुपयांपर्यंत मर्यादित राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिका हद्दीबाहेरील रुग्णांसाठी याच दरांपेक्षा सुमारे ५० टक्के अधिक शुल्क आकारले जाणार आहे. सरकारच्या विविध आरोग्य योजनाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची तरतूदही केली आहे.
अत्याधुनिक सुविधांसाठी तज्ज्ञ मनुष्यबळ
- महापालिकेच्या वाशी, नेरूळ येथील रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयांच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक उपकरणांची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार एमआरआय, सीटी स्कॅन व कॅथलॅबसारख्या सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- कॅथलॅब प्रकल्पांतर्गत यंत्रसामग्री महापालिकेच्या मालकीची ठेवून तज्ज्ञ मनुष्यबळ खासगी संस्थेकडून घेण्याची पद्धत अवलंबण्यात येणार आहे. त्यामुळे सेवा अखंडित राहण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
वाशी सार्वजनिक रुग्णालय - ४६.४६ कोटी
ऐरोली सार्वजनिक रुग्णालय - १४.९५ कोटी