

पनवेल, ता. २६ (बातमीदार) : शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर लगाम घालण्यासाठी पनवेल महापालिकेने कठोर भूमिका घेत सर्व प्रभागात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. कामोठे, खारघर, पनवेल व कळंबोली या प्रभागांतून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने प्रशासनाने तातडीने धडक कारवाई सुरू केली. अतिक्रमण विभागातील निष्क्रियतेवर बोट ठेवत सर्व पर्यवेक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली, तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी पर्यवेक्षक प्रशांत गायकर यांना निलंबित करण्यात आले आहे.
आयुक्त मंगेश चितळे यांनी स्पष्ट इशारा देत, अतिक्रमणाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. कारवाईदरम्यान अनधिकृत बॅनर, होर्डिंग, फुटपाथवरील अतिक्रमण तसेच आठवडा बाजारांवर मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई करण्यात आली. खारघरमधील हॉटेल्ससमोरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली, तर कामोठे परिसरात नर्सरी व हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली. यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालिका प्रशासनाने पुढे विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांचा समावेश असेल. रात्रीच्या वेळीही गस्त घालून अतिक्रमण रोखण्यावर भर दिला जाणार आहे.
अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी सांगितले की, प्रभागनिहाय लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत तक्रारींवर तत्काळ कारवाई केली जात आहे. नागरिकांनी अतिक्रमणाबाबत तक्रारी ‘पनवेल कनेक्ट’ ॲपवर नोंदवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विशेष टास्क फोर्स उभारणार
महापालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी विशेष टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे. यामध्ये १० सुरक्षा रक्षक व १० अतिक्रमण विभागाचे कर्मचारी असतील. तसेच रात्रीच्या वेळीही गस्त घालण्यात येणार आहे. अतिक्रमणसंदर्भात विशेष दखल घेत प्रभागनिहाय महापालिका सदस्यांच्या समवेत बैठका घेऊन, त्यांच्याकडून आलेल्या सूचनांची तत्काळ दखल घेण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.