वसईत बहरली सफरचंदाची बाग

वसईत बहरली सफरचंदाची बाग
Published on

वसईत बहरली सफरचंदाची बाग
प्रगतिशील शेतकऱ्याचा नवा प्रयोग

संदीप पंडित

विरार, ता. २६ (बातमीदार) : निसर्गाने नटलेल्या वसईच्या पूर्वपट्टीतील आंबोडे गावातील शेतकरी मनोहर भोईर यांनी आपल्या आठ गुंठे जागेत सफरचंदाची लागवड केली आहे. मुळात थंड हवेत येणारी सफरचंद आता वसईसारख्या उष्ण व दमट वातावरणात बहरू लागल्याने शेतकऱ्यांसाठी एक वेगळा मार्ग उपलब्ध झाला आहे. तसेच भोईर यांच्या झाडांना फळधारणा झाली असल्याने अनेक शेतकरी या बागेला भेटही देत आहेत.

वसईची पालेभाजी, केळी व विविध फळे ही प्रसिद्धच म्हणा. येथील विविध रानभाज्या व पालेभाज्या अनेक मुंबईकरांच्या ताटात पाहण्यास मिळतात. वसईचा मोठा पट्टा हा शहरी असला तरी येथील स्थानिक नागरिक यांनी शेतीची प्रथा काही सोडलेली नाही. येथे प्रत्येक हंगामातील शेती केली जाते. हीच वसईची खासियत आहे. आता चक्क येथील प्रगतिशील शेतकऱ्याने सफरचंदासारखं पीक घेत अनेकांना मातीत मेहनत घेतली, तर मनासारखं पीक उगवतं याची प्रचीती दिली आहे. याआधी वसईच्या मुळगाव येथील राफाएल डायस यांनी आपल्या परसबागेत द्राक्ष व सफरचंदाची यशस्वी लागवड केली होती. मात्र, ती एक ते दोन झाडेच होती, परंतु आंबोडे येथील शेतकरी मनोहर भोईर यांनी आठ गुंठे जागेत सफरचंदाची झाडे लावली आहेत.

श्रीरामपूर येथून आणलेल्या एना आणि हरिमन ९९ जातीच्या सफरचंदाची ५० रोपे त्यांनी आपल्या शेतात लावली असून, महत्त्वाचे म्हणजे या रोपांना फळधारणाही लागण्यास सुरुवात झाली आहे. ही रोपे लावल्यानंतर या झाडांना शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळ खत आणि सुफला खत देण्यात आले. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांत या झाडांना फळे आली. दरम्यान, यातील पहिली फळेही तोडून टाकण्यात येणार असल्याची माहिती भोईर यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना दिली. तसेच ही झाडे लावण्यासाठी २५ हजारांचा खर्च आल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
दोन वर्षांत चांगली फळधारणा
भोईर यांच्या मते, येत्या दोन वर्षांत एका झाडाला साधारपणे १५ ते २० किलोपर्यंत सफरचंद मिळतील. त्यांना या शेतीच्या कामात शेतीतज्ज्ञ असलेल्या दोन मुली व मुलगा मदत करत आहे. तसेच भोईर यांनी सफरचंदाच्या झाडांच्या मध्ये झेंडू आणि विविध प्रकारच्या भाजांची लागवडदेखील केली आहे. सुरुवातीला भातशेती करणाऱ्या भोईर यांनी केशरी आंब्यांची २५ झाडांची रोपेही आपल्या शेतात लावली आहेत. येत्या दोन वर्षांत सफरचंदाची लागवड चांगली झाल्यास आपण त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याची माहिती भोईर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com