बायोमेट्रिक सर्वेक्षणाला असहकार

बायोमेट्रिक सर्वेक्षणाला असहकार
Published on

बायोमेट्रिक सर्वेक्षणाला असहकार
घुसखोर ठरवून संक्रमण शिबिरांत सक्‍तीने कारवाई होणार; म्हाडाची कडक भूमिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ रहिवाशांची ओळख पटवण्याबरोबरच घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून सुरू असलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला तब्बल २,५०० रहिवाशांचा असहकार असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरापासून म्हाडाचे कर्मचारी त्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासासाठी संपर्क साधत असले तरी त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे त्यांना घुसखोर ठरवून सक्तीने सदनिका रिकामी करण्याची कारवाई करण्याच्या हलचाली म्हाडाकडून सुरू आहेत.
म्हाडाची मुंबई शहर आणि उपनगरांत ३४ ठिकाणी संक्रमण शिबिरे असून, त्यामध्ये २० हजार सदनिका आहेत. उपकर प्राप्त इमारती धोकादायक झाल्यानंतर त्यामधील रहिवाशांची पर्यायी व्यावस्था या संक्रमण शिबिरात म्हाडाकडून केली जाते. मात्र, गेल्या तीन-चार दशकांपासून अनेक रहिवासी सदरच्या संक्रमण शिबिरात वास्तव्यास असून, अद्याप त्यांना पुनर्रचित इमारतीत घर मिळालेले नाही. तसेच अनेकांनी आपल्या संक्रमण सदनिका परस्पर विकल्या आहेत, तर काही ठिकाणी घुसखोरांनी बेकायदेशीरपणे संक्रमण सदनिकांचा ताबा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर संक्रमण शिबिरात मूळ भाडेकरू कोण आहे, कोण घुसखोर आहे त्‍यानुसार रहिवाशांचे अ, ब व क प्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने म्हाडामार्फत वर्षभरापासून रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे.
संबंधित संक्रमण शिबिरात जाऊन म्हाडाचे कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत. वारंवार रहिवाशांना सर्वेक्षणासाठी पुढे येण्याबाबत आवाहन केले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत १६ हजार ५०० जणांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत संक्रमण शिबिरातील एक हजार रहिवाशांचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, आतापर्यंत सुमारे २५०० रहिवासी बायोमेट्रिकसाठी पुढे येण्यास टाळाटाळ करत आहेत.

कारवाई अटळ
म्हाडाकडून बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी वारंवार रहिवाशांना आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक जण त्याबाबत टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे संबंधित रहिवासी घुसखोर असण्याची शक्यता असल्यानेच ते पुढे येत नसल्याचे म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे संबंधित घुसखोर असल्याचे घोषित करून त्यांच्या सदनिका रिकाम्या करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले. म्हाडाने नुकतीच ३२ जणांवर कारवाई करत संक्रमण शिबिराबाहेर काढले आहे. त्यामुळे अद्याप ज्यांनी बायोमेट्रिक सर्वेक्षणात सहभाग घेतलेले नाही त्यांनी सर्वेक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन म्हाडाने केले आहे.

कुठे आहेत संक्रमण शिबिरे?
गोरेगाव, मालाड मालवणी, गोराई बोरिवली, चुनाभट्टी, प्रतीक्षानगर सायन, सहकार नगर विक्रोळी, शिवडी, पेरू कंपाउंड लालबाग, ओशिवरा, बिंबिसार नगर, सहकार नगर चेंबूर, कुलाबा, वडाळा, धारावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com