

वज्रेश्वरी, ता. २७ (बातमीदार) : गणेशपुरी येथील श्री सद्गुरू नित्यानंद समाधी मंदिरात सद्गुरू नित्यानंद बाबा यांच्या मूर्तीच्या जीर्णोद्धार व रंगलेपनाच्या पार्श्वभूमीवर ‘मूर्ती कलाकर्षण चालनाविधी’ या धार्मिक कार्यक्रमाला सोमवार (ता. २७)पासून सुरुवात होत आहे. कार्यक्रमांतर्गत दररोज सकाळी ७.३० ते १२.३० आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ७.०० या वेळेत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. यामध्ये ग्रामदेवता व स्थानदेवता निमंत्रण, कर्मारंभ, प्रधान संकल्प, पंचांग विधी, वास्तूमंडळ व सर्वतोभद्र मंडळ स्थापना, ईशान्य-वरुण स्थापना, अग्निमंथन, अग्निस्थापन, नवग्रह स्थापना व हवन, प्रधान हवन, सायंपूजन व आरती आदी विधींचा समावेश आहे.
मंगळवारी (ता. २८) सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत शांतिसूक्त पठण, संकल्प, स्थापित देवतांचे अभिषेक पूजन, मूर्ती अभिषेक, कुंभाभिषेक, उत्तरांग हवन, विशेष हवन, षडद्रव्य प्रधान हवन, बलिदान, पूर्णाहुती व वसोर्धारा आदी विधी पार पडणार आहेत. त्यानंतर ‘मूर्ती चालनाविधी’ होणार आहे. हे सर्व विधी स्मार्त चूडामणी पंडित शांतारामशास्त्री मोहिनीराज भानोसे व ग्रामजोशी वेदशास्त्र पंडित संतोष मुदगल गुरुजी यांच्या अधिपत्याखाली ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. विशेष म्हणजे, पंडित भानोसे यांनी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात झालेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रमुख पौरोहित्य केले होते. दरम्यान, मूर्तीच्या जीर्णोद्धार व रंगलेपनाच्या कालावधीत समाधी मंदिरातील नित्य पूजाविधी पालखीतील उत्सव मूर्ती व पादुका यांच्या माध्यमातून नियमितपणे सुरू राहणार आहेत. याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री भीमेश्वर सदगुरू नित्यानंद संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.