

अवजड वाहनांची घुसखोरी
मुंबई-बडोदा महामार्गावर डम्परची पुलाला धडक
मनोर, ता. २६ (बातमीदार) ः मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गावरील नावझे गावाच्या हद्दीत वन्यप्राण्यांसाठी उभारलेल्या पुलाला डम्परने धडक दिली होती. या अपघातात डम्परचे मोठे नुकसान झाले असून, चालकही जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर गौण खनिजांच्या बेकायदा वाहतुकीचा प्रश्न अधोरेखित झाला असून, अवजड वाहनांची घुसखोरी कळीचा मुद्दा बनला आहे.
पालघर जिल्ह्यातील मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही महिन्यांत महामार्गावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात आहे, पण असे असताना वाढत्या अपघात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित करत आहेत. पालघर तालुक्यातील नावझे गावाच्या हद्दीत वन्यप्राण्यांच्या हालचालीसाठी उभारलेल्या पुलाला शुक्रवारी एका डम्परने जोरदार धडक दिली होती. या अपघातात पुलाचे नुकसान झाले असून, मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवरील लोखंडी संरचननेचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे ठेकेदाराकडून नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर अवजड वाहतूक करून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तसेच ओव्हरलोड वाहनांच्या निष्काळजीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
---------------------------------------------
शेकडो ट्रकची वाहतूक
मासवणपासून सोनावे गावापर्यंत १५ किलोमीटर लांबीच्या द्रृतगती महामार्गाच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. नावझे, धुकटन गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात भराव सुरू आहे. मुरूम वाहतूक करणारे शेकडो ट्रक बेकायदा महामार्गाचा वापर करत आहेत.
--------------------------------
महामार्ग प्राधिकरणाची डोळेझाक
पालघर तालुक्यातील मासवणपासून वसई तालुक्यातील कोपर फाट्यापर्यंतच्या महामार्ग उभारणीसाठी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठीच्या वाहतुकीदरम्यान निष्काळजीमुळे अपघात होत आहेत, पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा प्रकार गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.
------------------------------------
पुलाखालून जात असलेल्या डम्परची धडक बसल्याने पुलाचे नुकसान झालेले नाही. तरीदेखील पुलाची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठेकेदार, चालकाविरोधात कारवाई केली जाईल.
मासवण ते सोनावेपर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केलेला नाही.
- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.