

दीपक हिरे : सकाळ वृत्तसेवा
वज्रेश्वरी, ता. २६ : सध्या गॅस तुटवड्याचा परिणाम प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेवर दिसू लागला आहे. भिवंडी ग्रामीण भागात गॅस सिलिंडर रिफिलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून, अनेक लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. तज्ज्ञांच्या मते, गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती , त्यात गॅस तुटवडा यामुळे गरीब कुटुंब त्रस्त झाले आहेत. याशिवाय, सबसिडी जमा होण्यास विलंब, बँकिंग प्रक्रियेतील अडथळे आणि वितरणातील त्रुटी या समस्यांमुळे लाभार्थी नाराज आहेत. परिणामी अनेक लाभार्थी वर्षातून केवळ एक किंवा दोनदाच सिलिंडर घेत आहेत.
भिवंडी ग्रामीण भागातील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली, पडघा, कोनगाव, पिंपळास, आंबाडी, दापोडे, सरवली आदी गावांमध्ये हजारो लाभार्थींना गॅसजोडणी मिळाली, तरी प्रत्यक्ष वापर अत्यल्प आहे. अधिकृत माहितीनुसार, मोठा लाभार्थी वर्ग वर्षभरात एकही सिलिंडर रिफिल करत नाही. काही कुटुंबे फक्त दोन-तीन वेळाच गॅसचा वापर करतात. परिणामी, ‘जोडणी आहे; पण वापर नाही’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक स्तरावर बुकिंग केल्यानंतर १५ ते ३० दिवस प्रतीक्षा करावी लागते. आता तर गॅस तुटवड्यामुळे ४५ दिवसांचा कालावधी वाढला आहे. परिणामी, आधीच कमी असलेला गॅस वापर आता आणखी घटला आहे. अनेक कुटुंबे पुन्हा लाकूड, शेणकांड्या यांसारख्या पारंपरिक इंधनाकडे वळली आहेत. एकंदरीत उज्ज्वला योजना ग्रामीण भागात निष्क्रिय ठरत असून महिलांची धूरमुक्तीतून सुटका झालीच नाही, असे दृश्य सध्या दिसून येत आहे.
पारंपरिक इंधनाला प्राधान्य
ग्रामीण व आदिवासी भागात अजूनही लाकूड, शेणकांड्या यांसारख्या पारंपरिक इंधनांचा वापर सुरू आहे. गॅसचा वापर केवळ आपत्कालीन किंवा सणासुदीच्या काळातच केला जातो. यामुळे महिलांचे आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा वापर या योजनेच्या मूलभूत उद्दिष्टांवर परिणाम होत असल्याची टीका होत आहे.
आर्थिक वास्तव
गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती हे समस्येचा मुख्य कारण आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी एकाच वेळी मोठी रक्कम देऊन सिलिंडर घेणे कठीण ठरते. जरी सरकारकडून सबसिडी दिली जात असली, तरी ती वेळेवर खात्यात जमा होत नाही. शिवाय, बँक प्रक्रियेतील अडचणी आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे लाभार्थ्यांचा विश्वास कमी झाला आहे.
इंधन वापराचे प्रमाण
०–२ सिलिंडर/वर्ष — मोठा वर्ग
३–५ सिलेंडर — मध्यम वापर
६+ सिलेंडर — अत्यल्प
गॅस – ३०%
लाकूड/शेण – ७०%
उज्ज्वला योजना चांगली आहे; पण तिचा प्रभाव वाढवण्यासाठी केवळ जोडणी देणे पुरेसे नाही. नियमित वापरासाठी आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करणे आवश्यक आहे.
- वैभव पवार, गणेशपुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.