नांदगावात सापडला १४व्या शतकातील ऐतिहासिक शिलालेख

नांदगावात सापडला १४व्या शतकातील ऐतिहासिक शिलालेख
Published on

नांदगावात सापडला १४व्या शतकातील शिलालेख
राजा हंबीरराव यांच्या काळाबाबत माहिती; अनिकेत पाटील यांचे वाचन
मुरूड, ता. २६ (वार्ताहर) ः मुरूड तालुक्यातील नांदगाव येथे चौदाव्या शतकातील राजा हंबीरराव यांच्या काळातील एक दुर्मिळ शिलालेख सापडल्याने इतिहास संशोधन क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. भवानी पाखाडी परिसरातील जनार्दन चोरघे यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीत हा शिलालेख आढळून आला असून, त्याचे वाचन इतिहास अभ्यासक अनिकेत अशोक पाटील यांनी केले आहे.
हा शिलालेख प्रत्यक्षात इ. स. २०००च्या सुमारास विहिरीतील गाळ काढताना सापडला होता. मात्र त्याकडे फारसे लक्ष गेले नाही. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या शिळेवरील काही अक्षरे झिजल्याने नष्ट झाली असली, तरी उर्वरित मजकुरावरून त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.
ही शिळा गधेगळ प्रकारातील असून, तिची वैशिष्ट्यपूर्ण रचना तीन भागांत विभागलेली आहे. वरच्या भागात चंद्र, सूर्य आणि मंगलकलशाच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. मध्यभागी २३ ओळींचा लेख आहे, तर खालच्या भागात गाढव आणि स्त्री यांचे संकरशिल्प कोरलेले आहे. अशा प्रकारच्या शिल्पांद्वारे राजाज्ञेचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या परिणामांचे प्रतीकात्मक दर्शन घडवले जात असे.
शिलालेखात हिजरी सन ७६९ तसेच शके १२८९ असा उल्लेख आहे, ज्यावरून हा शिलालेख इ. स. १३६७-६८च्या कालखंडातील असल्याचे स्पष्ट होते. लेख देवनागरी लिपीत असून, त्यात फारसी शब्दांचाही वापर आढळतो. यामुळे त्या काळातील भाषिक आणि सांस्कृतिक प्रभाव स्पष्ट होतो.
या लेखात नांदिगौ (नांदगाव), मरूड (मुरूड) आणि चेउळ (चौल) या गावांचा उल्लेख आहे. तसेच ठाणे-कोंकण प्रदेशावर राज्य करणाऱ्या राजा हंबीरराव यांचा ‘श्रीमत्य प्रौढिप्रताप चक्रवर्ती महाराजाधिराज’ असा गौरवपूर्ण उल्लेख आढळतो. त्यांच्या प्रधान ‘सिहीप्रो’ यांनी नांदगावातील एक वाडी ४०० द्राम किमतीने घेऊन ती राम जोशी, कृष्ण जोशी आणि कुम जोशी यांच्यात समान वाटल्याची नोंद या शिलालेखात आहे.
या शिलालेखामुळे मुरूड तालुक्याच्या इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा समोर आला असून, यासंदर्भात अधिक सखोल संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

हंबीररावांच्या राज्यकारभाराचा ठोस पुरावा
नांदगाव येथे सापडलेला हा शिलालेख राजा हंबीरराव यांच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या ठाणे-कोंकणातील राज्यकारभाराचा ठोस पुरावा मानला जात आहे. यापूर्वी उपलब्ध असलेल्या चार शिलालेखांनंतर हा पाचवा शिलालेख असून, त्यातून त्या काळातील प्रशासन, दानपद्धती आणि अधिकार रचना यांची स्पष्ट माहिती मिळते.

चौदाव्या शतकातील भाषा, संस्कृतीचा आरसा
या शिलालेखातील देवनागरी लिपीसोबत फारसी शब्दांचा वापर दिसून येतो. यामुळे त्या काळातील मराठी भाषेवर झालेला इस्लामी प्रभाव अधोरेखित होतो. तसेच गधेगळ रचनेतून सामाजिक संदेश देण्याची पद्धत आणि धार्मिक-प्रशासकीय परंपरा यांचाही अभ्यास करता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com