

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : मध्यंतरी दिवा परिसरात तब्बल ४८ घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून १.०३ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी काहीसा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा घरफोडीच्या घटना वाढू लागल्याने चोरट्यांनी पोलिसांनाच खुले आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एका दिवसाच्या अंतरात दिवा पश्चिम आणि पूर्व येथे दोन घरफोड्यांच्या घटना घडून पावणेबारा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या तोंडावर घडलेल्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवा पश्चिम येथे २३ एप्रिलला भरदिवसा घरफोडीची घटना घडली. अक्षय घडशी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १०.०१ लाखांचा ऐवज चोरून नेला. ही चोरी काही मिनिटांत उरकण्यात आल्याने चोरट्यांची धाडसी पद्धत स्पष्ट होते. यापूर्वी दिवा पूर्व येथे २२ एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास आणखी एक घरफोडी झाली होती. सुनील कांबळे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉकर फोडून सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम असा एकूण १.६४ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने घरात प्रवेश करून थेट कपाटातील लॉकरलाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकारामागे सराईत टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दोन्ही प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.