

कोकण कृषी विद्यापीठाला ११२ कोटींचा ‘महाअन्नपूर्णा’ प्रकल्प
भातशेतीच्या विकासासाठी राज्य, केंद्राचा संयुक्त उपक्रम
कर्जत, ता. २६ (बातमीदार) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना भातशेतीच्या सर्वांगीण विकासासाठी ११२ कोटी रुपयांचा ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प १.०’ मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील भात उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होणार असून, कृषी क्षेत्रात हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपाइन्स यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे या प्रकल्पाला जागतिक दर्जाचे सहकार्य मिळणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, सचिव परिमल सिंग आणि संचालक विनयकुमार आवटे यांच्या सहकार्यामुळे प्रकल्पाला मंजुरी मिळाली.
हा प्रकल्प पाच वर्षांसाठी असून, ६० टक्के निधी केंद्र शासनाकडून तर ४० टक्के निधी राज्य शासनाकडून दिला जाणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या १४ संशोधन केंद्रांवर तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथील डॉ. बी. डी. वाघमोडे हे या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आहेत.
राज्यातील भातशेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामान बदल, किडी-रोगांचा प्रादुर्भाव, मनुष्यबळाची कमतरता यांसारख्या अडचणींमुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून भातशेती अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पातून ठेवण्यात आले आहे.
चौकट
भातशेतीत क्रांती घडविण्याची संधी
‘महाअन्नपूर्णा प्रकल्प १.०’मुळे राज्यातील भातशेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून, बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या भात वाणांची निर्मिती शक्य होणार आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना नवीन ज्ञान, प्रशिक्षण आणि सुधारित बियाणे उपलब्ध होणार असून, यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.