भिवंडीमार्गे सुसाट ‘समृद्धी’ प्रवास

भिवंडीमार्गे सुसाट ‘समृद्धी’ प्रवास
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. ठाण्यावरून भिवंडीमार्गे जाणारा हा मार्ग ‘समृद्धी’ला जोडला असल्याने ठाणे-भिवंडी मार्गावरील वाहतुकीला अक्षरशः ‘समृद्धी’ची गती मिळणार आहे. अनेक वर्षे कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यातील भीषण अडथळ्यांनी त्रस्त असलेला हा मार्ग अखेर सुसाट बनला असून कोंडीमुळे प्रवासाचा लांबणारा वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा महामार्ग ‘तोकडा’ भासू लागल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या रुंदीकरणाचे काम ‘एमएमआरडीए’मार्फत सुरू आहे. आधीच अरुंद त्यात खड्डे आणि रुंदीकरणाचे काम अशा तिहेरी कात्रीत हा मार्ग अडकल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन मिनिटांचा प्रवास तासाभरावर रखडत चालला असल्याचा अनुभव आहे; पण आता या मार्गावरील अडथळे दूर होत असून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खारेगाव खाडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते अंंजूरदिवेपर्यंत हा पूल असून आता एकूण आठ पदरी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. पुलावरील नाशिक मार्गावरील मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्याची लोडटेस्टिंगही पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर हा मार्ग येत्या सोमवारी (ता. २७) किंवा मंगळवारी (ता. २८) वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे; मात्र त्याआधीच या मार्गिकेवरून वाहतूक सुरू झाली असून समृद्धी महामार्ग गाठणाऱ्या वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अवजड वाहतुकीला दिलासा
भिवंडी हा लॉजिस्टिक्स हब असल्याने या मार्गावर कंटेनर आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. नव्या पुलावर स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्याने अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक वेगळी झाली आहे. त्यामुळे अपघातांचा धोका कमी झाला असून वाहतूक अधिक शिस्तबद्ध झाली आहे.

पावसाळ्यातील अडथळ्यांवर मात
पूर्वी पावसाळ्यात खड्डे, चिखल आणि पाणी साचण्यामुळे हा मार्ग अक्षरशः ठप्प होत असे. अनेकदा रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवादेखील कोंडीत अडकून पडत. नव्या पुलामुळे उंची आणि जलनिस्सारणाची योग्य व्यवस्था केल्याने पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

विकासाला गती
खारेगाव पूल सुरू झाल्याने ठाणे-भिवंडी-समृद्धी महामार्ग हा प्रवास अधिक जलद आणि विश्वासार्ह झाला आहे. याचा थेट परिणाम औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्रावर होणार असून, परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com