जर्मनीत फुले-आंबेडकरी विचारांचा जागतिक पताका

जर्मनीत फुले-आंबेडकरी विचारांचा जागतिक पताका
Published on

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २६ : समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या उद्देशाने जर्मनीत पहिल्यांदाच महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पताका उभारण्याचा ऐतिहासिक उपक्रम २ मे रोजी राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र, पंजाब आणि दक्षिण भारतीय प्रवासी समाजाच्या पुढाकारातून ‘आंबेडकराइट्स इंटरकल्चरल मिशन’ या नोंदणीकृत संस्थेच्या नेतृत्वाखाली; तसेच जर्मनी आणि युरोपमधील विविध आंबेडकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम होणार आहे. मैन्झ-कास्टेल येथील ब्युर्गरहाउस कास्टेल येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत कार्यक्रम पार पडणार आहे. या उपक्रमाचे नेतृत्व रितेश कडबे करत असून, त्यांना नितेश गायकवाड, रूपेश जाधव, सुभाष चव्हाण आणि रवी जीलते यांचे सहकार्य लाभत आहे. समाजात सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची जाणीव अधिक दृढ करणे आणि आंबेडकरी विचारसरणीला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमाला फ्रँकफर्ट येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या कॉन्सुलर जनरल सुश्री शुचिता किशोर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचे पठण आणि विविध मान्यवरांचे प्रेरणादायी विचारांचा समावेश असणार आहे. सुमारे २०० नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडण्याची अपेक्षा आहे. युरोपमधील विविध संघटनांच्या सहकार्याने हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव न राहता सामाजिक परिवर्तनाच्या नव्या चळवळीची ठोस नांदी ठरणार आहे. जर्मनीतून सुरू होणारी ही चळवळ आगामी काळात संपूर्ण युरोपमध्ये विस्तारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


आंबेडकरी कुटुंबांसाठी आधारव्यवस्था
‘आंबेडकराइट्स इंटरकल्चरल मिशन’ ही संस्था परदेशात वास्तव्यास असलेल्या आंबेडकरी विद्यार्थी व कुटुंबांसाठी आधारव्यवस्था निर्माण करत आहे. यातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com