

सानपाडा मार्केटचे लोकार्पण रखडले
न्यायालयीन अडथळ्यांमुळे विक्रेते, नागरिक त्रस्त
नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर १४ येथील पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले सुसज्ज मार्केट न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडल्याने लोकार्पण रखडले आहे. परिणामी नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी पायपीट करावी लागत असून, विक्रेत्यांना हक्काचे गाळे मिळत नसल्याने उड्डाणपुलाखाली व्यवसाय करावा लागत आहे. पालिकेच्या उदासीनतेमुळे आणि गाळेवाटपातील अडथळ्यांमुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
नवी मुंबई महापालिकेने सानपाडा मोराज सर्कल परिसरातील फेरीवाल्यांसाठी हे मार्केट उभारले होते. पालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून येथे शंभरहून अधिक फेरीवाले व्यवसाय करीत होते. उड्डाणपूल उभारल्यानंतर त्यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार २०१७मध्ये न्यायालयाने पालिकेला फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले.
मात्र मार्केट तयार असूनही फेरीवाल्यांना त्यात सामावून घेण्यास पालिकेने नकार दिल्याने संघर्ष निर्माण झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला ट्रस्टने पुन्हा न्यायालयात धाव घेत गाळेवाटपावर स्थगिती मिळवली. पालिकेकडून प्रतिज्ञापत्र दाखल न झाल्याने ही प्रक्रिया अधिकच लांबली आहे.
चौकट
गाळेवाटपावर स्थगिती
फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी बांधलेले मार्केट तयार असूनही गाळेवाटपावर स्थगिती आहे. पालिकेच्या निष्क्रियतेमुळे विक्रेत्यांना पर्यायी सुविधा मिळालेल्या नाहीत.
मार्केटचा गैरवापर
उद्घाटन न झाल्याने मार्केट परिसरात अवैध पार्किंग, अस्वच्छता आणि भटक्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या मार्केटचा वापर अवैध पार्किंगसाठी होत असून, परिसरात अस्वच्छता वाढली आहे. भटके कुत्रे आणि भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.