अवकाळीने बागायतदार धास्तावले

अवकाळीने बागायतदार धास्तावले
Published on

अवकाळीने बागायतदार धास्तावले
आंबापीक विम्यासाठी ७२ तासांत तक्रार अनिवार्य; नुकसान झाल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २६ : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्यांमुळे हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, फळगळ होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झाल्यास फळपीक विमा योजनेअंतर्गत ७२ तासांच्या आत तक्रार नोंदवणे बंधनकारक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि ताशी २५ किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. फळधारणेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर हवामानातील अचानक बदल झाल्याने फळगळ वाढू शकते, अशी भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले की, विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास तातडीने टोल फ्री क्रमांक १४४४७ वर संपर्क साधावा किंवा स्थानिक कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी. वेळेत तक्रार नोंदवली नाही, तर नुकसानभरपाई मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात ७,०९१ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, सुमारे ३,५२५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आहे. काजू पिकासाठी २०० शेतकरी सहभागी असून, ८९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या योजनेत हवामान केंद्रांद्वारे पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग आणि आर्द्रतेच्या नोंदींच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित केली जाते.
दरम्यान, १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत ताशी २५ किमी किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने वारे वाहिल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकते. २५ किमी वेगासाठी सुमारे २०,०३६ रुपये प्रति हेक्टर, तर अधिक वेगासाठी ३४,००० रुपये प्रति हेक्टरपर्यंत भरपाई देय आहे.

चौकट
नुकसानभरपाईत अडचणी
नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसानभरपाई मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

वाऱ्यामुळे नुकसान धोका
ताशी २५ किमीपेक्षा अधिक वेगाने वारे वाहिल्यास फळगळ होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत प्रति हेक्टर २०,०३६ ते ३४,००० रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com