

पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग
परिचारिकांसाठी विशेष प्रशिक्षण; महिलांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य
पनवेल, ता. २६ (बातमीदार) : महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पनवेल महापालिकेने कर्करोग प्रतिबंध व लवकर निदान मोहिमेला वेग देत परिचारिकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली. टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमातून स्तन, गर्भाशय मुख आणि तोंडाच्या कर्करोगाबाबत जनजागृती व तपासणी अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.
सिडको समाज केंद्र, कामोठे येथे मार्च व एप्रिल महिन्यात दोन टप्प्यांत आयोजित या कार्यशाळेत एकूण १२० नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणात कर्करोगाची लक्षणे, जोखमीचे घटक, तपासणी पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. एचपीव्ही डीएनए चाचणी, पॅप स्मीअर आणि व्हीआयए तपासणीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच स्तन स्वयंपरीक्षण, तंबाखू निर्मूलन आणि जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवत नर्स आणि आशासेविकांशी संवाद साधला. त्यांनी प्रशिक्षणाचा आढावा घेत अडचणी जाणून घेतल्या आणि आरोग्यसेविकांना अधिक सक्षम करण्यावर भर दिला.
या उपक्रमातून प्रशिक्षित नर्स आणि आशासेविकांच्या माध्यमातून नागरी आरोग्य केंद्रांवर कर्करोग तपासणी शिबिरे अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहेत. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.
कोट :
महिलांचे आरोग्य हे समाजाच्या सुदृढ भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, लवकर निदान आणि जनजागृती यावर आम्ही विशेष भर देत आहोत. प्रत्येक महिलेला वेळेवर तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.
- ममता प्रीतम म्हात्रे,
सभापती, महिला-बालकल्याण समिती, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.