कोपरीतील मलनिस्सारण प्रकल्प ठरला पांढरा हत्ती!

कोपरीतील मलनिस्सारण प्रकल्प ठरला पांढरा हत्ती!
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे पूर्वेतील कन्हैय्या नगरलगत उभारण्यात आलेला मलनिस्सारण प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ ठरला आहे. सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करून महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्याचा उद्देश असलेल्या या प्रकल्पातून अद्याप एक रुपयाही उत्पन्न मिळालेले नाही. उलट कंत्राटदाराला दरवर्षी सुमारे १० कोटी रुपये अदा करावे लागत असल्याने करदात्यांच्या पैशांची नाहक उधळपट्टी होत असल्याचा दावा आमदार संजय केळकर यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेने पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्याचे काम २०२१ मध्ये ए. के. इलेक्ट्रिकल्स या कंपनीला दिले होते. वर्षभरात प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २०२५ पर्यंतही पूर्ण क्षमतेने तो सुरू झालेला नाही. १२० एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता असतानाही सध्या केवळ पाच एमएलडी पाणी प्रक्रिया होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक भरत चव्हाण आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पातील अनियमितता, विलंब आणि कार्यक्षमतेअभावी कंत्राटदाराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे केळकर यांनी नमूद केले. तसेच प्रकल्पातून निर्माण होणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीने न हाताळता जवळील नाल्यात आणि कांदळवन क्षेत्रात टाकला जात आहे. त्यामुळे ठाणेकरवाडी परिसरात पावसाळ्यात पाणी शिरण्याचे प्रमाण वाढून नागरिकांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. यात कांदळवन नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची चिंताही व्यक्त केली.

कंत्राटदारांच्या क्षमतेवरच संशय
केंद्र सरकारने याप्रकरणी ९० कोटींचा दंड ठोठावला आहे, तर घेतलेल्या कर्जावर नऊ कोटी एवढे व्याज भरण्यासाठी कंत्राटदार कंपनी टाळाटाळ करत आहे. कंत्राटदार आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. १२० एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पातून फक्त पाच एमएलडी पाणी शुद्ध होत असल्याने कंत्राटदारांच्या क्षमतेवरच संशय निर्माण होत आहे.

कररूपी पैशांची लूट!
सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आणि शुद्ध पाणी विक्रीतून उत्पन्न मिळवणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश होता. मात्र, अपेक्षित जलनिर्मिती आणि विक्री दोन्ही बाबींमध्ये अपयश आल्याने हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या तोट्यात गेला आहे. तरीही कंत्राटदाराला दरवर्षी मोठी रक्कम देण्यात येत असल्याने हा प्रकार करदात्यांच्या पैशांची लूट असल्याचे केळकर म्हणाले.

अनेकांचे हात
या प्रकल्पातून तयार होणारे शुद्ध पाणी बांधकामे, उद्याने, एमआयडीसी, कारखाने आदींना पुरवून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे अपेक्षित आहे. या उद्देशाला हरताळ फासले आहे. विशेष म्हणजे या संशयास्पद कंत्राटदार कंपनीला एक दोन नव्हे तर आठ प्रकल्पांची कामे दिली आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारात अनेक हात गुंतल्याचा दावा करत आमदार संजय केळकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com