थोडक्यात

थोडक्यात
Published on

थोडक्यात
बेलापूरमध्ये ४० ठिकाणी वॉटर कूलर बसविणार
वाशी (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बेलापूर विभागातील ४० सार्वजनिक ठिकाणी वॉटर कूलर बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. वाढत्या उन्हामुळे उद्याने, बस स्थानके व बाजारपेठांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत असल्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २.०’ व ‘मिशन लाइफ’ अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, सुमारे १.२६ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
-----------------------------------------------
सीवूड्स येथे मर्दानी खेळाचे प्रशिक्षण
नेरूळ (बातमीदार) : सीवूड्स येथे शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. डॉ. दिग्विजय जगताप, स्नेहा पाटील, कृती गजेरा व शांतिदूत मर्दानी आखाड्याच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लाठीकाठी, तलवारबाजी, भाला व दांडपट्टा या पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख प्रशिक्षक सागर मका मले, ऋषिकेश सूर्यवंशी व दीपक कंक यांनी शस्त्रांचे मूलभूत तंत्र, संरक्षणातील उपयोग आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. शिबिराच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
-------------------------------------------------------------------------
नेरूळमध्ये मोफत योगा अभ्यासक्रम सुरू
नेरूळ (बातमीदार) : श्री अंबिका योग कुटीरच्या वतीने वार्षिक मोफत योगा अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. सेक्टर १ येथील न्यू बॉम्बे हायस्कूलमध्ये १३२ वी बॅच २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. हा अभ्यासक्रम दर रविवारी सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत घेतला जाणार असून, त्याचा कालावधी १२ आठवड्यांचा आहे. मधुमेह, रक्तदाब, पाठदुखी, अर्थरायटिस व स्पॉन्डिलायटिस यांसारख्या व्याधींनी त्रस्त असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------------------------------
मालुसरे क्रीडांगणातील गटार सफाईची मागणी
नेरूळ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर ६ मधील तानाजी मालुसरे क्रीडांगणातील पावसाळी गटाराची तळापासून सफाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. गटारात साचलेला गाळ, माती व दगडांमुळे दुर्गंधी व डासांचा त्रास वाढला असून, नागरिकांना गैरसोय होत आहे. तसेच काही ठिकाणी गटाराची झाकणे निखळल्याने धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने सफाई करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
-------------------------------------------------------
उलवे येथे देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
उलवे (बातमीदार) : उलवे सेक्टर १७ येथील सद्गुरू चौक परिसरात काही व्यक्तींनी देवी-देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संबंधितांनी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यानंतर नागरिकांनी एकत्र येत निषेध नोंदवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com