

ऐतिहासिक केईएमचे नाव बदलण्यास विरोध
ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली अधिष्ठात्यांची भेट; निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईतील ऐतिहासिक केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले असून, स्थानिक आमदार अजय चौधरी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह नगरसेवकांनी सोमवारी (२७) सकाळी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत निवेदन सादर केले.
केईएम रुग्णालयाला १०० वर्षांहून अधिकचा इतिहास असून, नुकतेच त्याचे शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. देश-विदेशातील नामांकित डॉक्टर, माजी अधिष्ठाते, तसेच विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या रुग्णालयाचे नाव अचानक बदलण्याचा प्रस्ताव आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
प्रस्तावानुसार रुग्णालयाचे नाव ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे करण्याचा विचार पुढे आला असून, हा निर्णय घाईघाईत आणि योग्य प्रक्रियेशिवाय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केईएम रुग्णालयाच्या नामांतरामागे काहींचा स्वार्थ दडलेला असून, दादागिरी करून, दबाव टाकून असे निर्णय घेतले जात आहेत. लाेढा यांनी उभारलेल्या टॉवर्सपैकी एक टॉवर धर्मादाय रुग्णालयासाठी द्यावा आणि हवे ते नाव द्यावे.
- अजय चौधरी, आमदार
मूलभूत सुविधांवर लक्ष देण्याची गरज
रुग्णालयाचे नाव बदलण्याऐवजी येथील मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे आहे. रुग्णालयात सध्या नर्सेसची कमतरता, एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफीसारख्या सेवांतील अडचणी, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी यांसारख्या समस्या असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. याबाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी हे शिष्टमंडळ लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेणार असून, शेकडो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
महापालिकेत मुंबईच्या हिताच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले जात नाही. या विषयात मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. केवळ पैशाच्या जोरावर इतिहास बदलण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.
- किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेत्या, मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.