

कर्जत ते मंत्रालय ५ जूनला पायी मोर्चा
धरणे व प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक
कर्जत, ता. २७ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यात प्रस्तावित धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमींनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कर्जत ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. रविवारी (ता. २६) कर्जत शनी मंदिर येथे झालेल्या बैठकीत जनहित याचिका दाखल करण्यासाठी निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्जत हा निसर्गसंपन्न म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. मात्र, सध्या पोशीर, शिलार, कोंढाणा धरण, जलविद्युत प्रकल्प असे अनेक प्रकल्प येथे सुरू किंवा प्रस्तावित आहेत. या सर्वांसाठी हजारो एकर जमीन संपादित होणार असून, शेती, गावे, वने आणि स्थानिकांचा सांस्कृतिक वारसा धोक्यात येणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. हजारो झाडांची तोड, भूजल पातळी घट आणि पर्यावरणीय असंतुलनाबाबत स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पाली-भूतिवली धरणाला ४० वर्षे उलटूनही त्याचा अपेक्षित उपयोग झाला नसल्याची टीका होत आहे, तर कोंढाणा धरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पांचा फायदा कर्जतकरांना होत नाही. पाणी व वीज महानगरांकडे वळवली जाते, असे ॲड. कैलास मोरे यांनी म्हटले आहे. याविरोधात आता आक्रमक भूमिका घेत कर्जत ते मंत्रालय ५ जूनला पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मे महिन्यात कर्जत प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन घेण्याचेही ठरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.