

बालरंगभूमीचा जल्लोष
मंगेश कदम यांच्या हस्ते बालनाट्य शिबिराचा उत्साहात शुभारंभ
वाशी, ता. २७ (बातमीदार) ः नवी मुंबईतील बालकलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संत शिरोमणी कलावंत आणि नवी मुंबई बालरंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालनाट्य शिबिराचा सोहळा पार पडला. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मंगेश कदम यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले.
गेली २९ वर्षे सातत्याने श्रीहरी पवळे या उपक्रमाचे आयोजन करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील बालरंगभूमी बहरत आहे. यावर्षी २५ एप्रिल ते ६ मे या कालावधीत चालणाऱ्या या शिबिरात ७ ते २० वयोगटातील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. अभिनय, संवादफेक, देहबोली, रंगमंचावरील वावर, तसेच नृत्य व गायन यांसारख्या विविध कलांचा संगम या शिबिरात विद्यार्थ्यांना अनुभवता येत आहे. त्यामुळे बालकलावंतांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरत आहे.
मंगेश कदम यांनी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. लहान वयातच नाट्यकलेची ओळख झाली, तर आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सर्जनशीलता मोठ्या प्रमाणात वाढते, असे मत व्यक्त केले. तसेच आयोजकांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
नवोदित कलावंतांना व्यासपीठ
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर सादरीकरणाची संधी देण्यात येत असून, अनुभवी मार्गदर्शकांकडून त्यांना तांत्रिक आणि सर्जनशील प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, शिस्त आणि आत्मविश्वास यांची जाणीव दृढ होत आहे. शिबिराचा समारोप ६ मे रोजी होणार असून, त्या दिवशी विद्यार्थी विविध नाट्यछटा, नाटिका, नृत्य आणि गायनाचे सादरीकरण करणार आहेत. नवी मुंबईत बालरंगभूमीला चालना देणारा आणि नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरत असून, शहराच्या सांस्कृतिक जीवनात भर घालणारा महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.